Join us
Daily Top 2Weekly Top 5

मृणाल कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले यांच्या 'अवांछित’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 16:27 IST

‘अवांछित’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

बाप हा बाप असतो आणि आई ही आई असते’, असं अनेकदा ऐकलंय. पण आई-बापाची जागा कोणीच भरुन काढू शकत नाही हे देखील तितकंच जगमान्य सत्य आहे. नात्यांमध्ये कधी-कधी खटका उडतो, कधी दु:ख वाटेला येतं पण नात्यांमधला आनंद कायम टिकवून ठेवण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेऊन, हेवेदावे बाजूला ठेवून नाती जपावी लागतात आणि मुख्य म्हणजे नात्यात संवाद असावा लागतो... असा सुंदर संदेश देणारा नवा कोरा मराठी सिनेमा ‘अवांछित’ येत्या १९ मार्चला झीप्लेक्सवर भेटीला येतोय.

‘अवांछित’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची कथा वडील-मुलाच्या नात्यावर आधारित आहे. दोघांचे भिन्न स्वभाव, एकमेंकांविरोधी मतं असणा-या वडील- मुलाची भूमिका अभिनेते किशोर कदम आणि अभय महाजन यांनी साकारली आहे. त्यांच्या सोबतीला मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, योगेश सोमण  आणि राजेश शिंदे हे देखील या सिनेमाचा भाग आहेत. सिनेमाला अनुपम रॉय यांचे संगीत लाभले असून गाण्यांचे बोल ओमकार कुलकर्णी यांनी लिहिले आहेत.

सिनेमा जरी मराठी असला तरी सिनेमातील लोकेशन्स पश्चिम बंगाल, कलकत्ता येथील आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने कलकत्यातील राहणीमान, संस्कृती मराठी सिनेमात पाहायला मिळणार आहेच, पण त्यासोबत या नवीन आशय असलेल्या  सिनेमात बंगाली कलाकार बरून चंदा, असीम दास, दिलीप दवे, अरुण गुहा ठाकूरता, राणा बासू ठाकुर यांचा अभिनय पाहण्याची संधी देखील मिळणार आहे. ‘अवांछित’१९ मार्चला झीप्लेक्सवर रिलीज होणार आहे. 

टॅग्स :मृणाल कुलकर्णी