मराठी मनोरंजन विश्वात सध्या विविध विषयांवरील सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मराठी इंडस्ट्रीत अशाच एका सिनेमाची सध्या चर्चा आहे. हा सिनेमा म्हणजे 'शातिर'. विशेष म्हणजे हा सिनेमा सत्य घटनेवर आधारीत आहे. सध्याच्या तरुणाईची कथा सांगणारा, सत्य कथेवर आधारित शातीर, द बिगिनिंग या चित्रपटाची निर्मिती श्रियांश आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या माध्यमातून रेश्मा वायकर यांनी केली आहे. रेश्मा यांनीच सिनेमात प्रमुख भूमिका साकारली आहे. काल सोशल मीडियाच्या माध्यमातून 'शातिर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला.
'शातिर' सिनेमाचा ट्रेलर
'… तर ही वानरसेना तुझ्या सोन्याच्या लंकेची राख रांगोळी करेल', असा इशारा अट्टल गुन्हेगारांना देणारा शातीर चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडियावर नुकताच लॉन्च झाला आहे. या ट्रेलरमुळे आधीच चर्चेत असलेल्या या चित्रपटाबद्दल उत्सुकता निश्चितपणे वाढवली जाणार आहे. सध्याच्या तरुणाईची कथा या चित्रपटाद्वारे सांगण्यात येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून सुनील सुशीला दशरथ वायकर यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. सध्याच्या तरुण पिढीला पडलेला अमली पदार्थांचा विळखा, ड्रग्स माफिया आणि पोलीस यंत्रणेच्या संघर्ष, व्यसनाधीनता, गुन्हेगारी यांच्याविरुद्ध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उभारलेला लढा या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
कधी रिलीज होणार शातिर?
शातिर The Beginning या चित्रपटात रेश्मा वायकर या प्रमुख भूमिकेत असून योगेश सोमण, रमेश परदेशी, मीर सरोवर, रामेश्वर गीते, गौरव रोकडे, निशांत सिंग, मनोज चौधरी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाला रोहित नागभिडे यांचे संगीत असून वैभव देशमुख गीतकार आहेत. चित्रपटातील गीतांना वैशाली सामंत, मुग्धा कऱ्हाडे यांनी स्वरसाज चढवला आहे. सत्य घटनेवर आधारित, तरुणाईतील ड्रग्ज, व्यसनाधीनता असा संवेदनशील विषय घेऊन येणार, सस्पेन्स थ्रीलर असलेला शातिर The Beginning हा मराठी चित्रपट येत्या 23 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.