Namrata Sambherao: अभिनेत्री नम्रता संभेरावने (Namrata Sambheraoमराठी मालिकाविश्वातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत इंडस्ट्रीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. गेल्या वर्षांमध्ये अभिनेत्रीचा चाहतावर्ग कमालीचा वाढला आहे. सिनेक्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर नम्रता संभेरावने २०१३ मध्ये योगेश संभेराव यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांच्या सुखी संसाराला आता १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. याचनिमित्ताने नम्रताने सोशल मीडियावर सुंदर पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री नम्रता संभेराव तिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मीडियावर तिच्या त्रिकोणी कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे. त्याचबरोबर कॅप्शनमध्ये नवऱ्याचं कौतुक करत तिने लिहिलंय,"लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा योगेश माझा सगळ्यात मोठा आधार रुद्राजचा लाडका बाबा. गेल्या १२ वर्षात घडलेल्या प्रत्येक चांगल्या वाईट क्षणात तू सोबत आहेस. हसत खेळत भांडत एकमेकांना सांभाळत प्रेम करत आपण एक साधं सरळ आयुष्य जगतोय. एकमेकांना जपतोय. आयुष्यभर अशीच साथ सोबत हवीय तुझी. आपल्यातली मैत्री आणि प्रेम अधिकाधिक बहरत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.जशी आहे तसं मला सहन करणाऱ्या माझ्या नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा." अशी सुंदर पोस्ट लिहून अभिनेत्रीने शेअर केली आहे.
दरम्यान, नम्रता आवटे-संभेरावने महाराष्ट्राची हास्यजत्रा शोव्यतिरिक्त 'फु बाई फु', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवले. तर 'पुढचं पाऊल', 'लज्जा', 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'एक मोहोर अबोल' या मालिकांमधून तिने गंभीर धाटणीच्या भूमिकादेखील निभावल्या. 'बाबू बँड बाजा' या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. 'व्हेंटिलेटर' या चित्रपटात तिने साकारलेली भूमिका सुद्धा खूप गाजली.