Chhaya Kadam : 'लापता लेडीज', 'सैराट', 'ऑल वुई इमॅजिन' यांसारख्या चित्रपटांमुळे जगभरात ओळख मिळवलेल्या अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) सध्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मुळे (Cannes Film Festival 2025) चर्चेत आल्या आहेत. यंदाच्या कान्स फेस्टिव्हलमध्ये त्यांनी हजेरी लावली आहे. कान्समधील त्यांचं हे दुसरं वर्ष आहे. याच दरम्यान त्यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सर्वाधिक चर्चा होताना दिसते आहे.
'कान्स फेस्टिव्हल'ला गेल्यानंतर छाया कदम यांनी तिथील बर्फवृट्टीचा आनंद घेतला आहे. याबाबत सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन त्यांनी लिहिलंय की, "आजवर फक्त पडद्यावर बघितलेली बर्फवृष्टी माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच प्रत्यक्ष अनुभवली. योगायोग असा की मला दुसऱ्यांदा ‘कान्स’वारी घडवणाऱ्या चित्रपटाचं नावही ‘Snowflower’ आहे. काही गोष्टी जुळून येण्यासाठी वेळ जावा लागतो, पण त्या जुळून आल्या की मिळणारा अनुभव Snowfall इतकाच अवर्णनीय असतो. या भरभरुन दिलेल्या अनुभवासाठी Thank you so much...", अशा आशयाची सुंदर पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. छाया कदम यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर अभिनेत्री नम्रता संभेराव, भाग्यश्री मिलिंद तसंच बऱ्याच कलाकारांनी कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर छाया कदम यांचा हा कान्सवारीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
दरम्यान, सिनेविश्वातील मानाचा मानला जाणारा कान्स चित्रपट महोत्सव १३ मे पासून सुरू झाला आहे. हा ७८ वा कान्स चित्रपट महोत्सव येत्या २४ मे २०२५ पर्यंत चालणार आहे. यंदाच्या महोत्सवात, ऐश्वर्या राय, जान्हवी कपूर, शर्मिला टागोर, करण जोहर आणि ईशान खट्टर यांसारख्या सेलिब्रिटींचा रेड कार्पेटवर जलवा पाहायला मिळाला.