Join us  

अश्विनी भावे यांना 'ही' एका चूक पडली महागात; अचानकपणे लेकाचं बोलणं झालं होतं बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 6:59 PM

Ashvini bhave: मुलांना मातृभाषेसह फॉरेन लँग्वेज शिकता यावी यासाठी अश्विनी यांनी अनेक प्रयत्न केले. परंतु, त्याचे परिणाम उलट झाले.

 १९९० चा काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. उत्तम अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर अश्विनी यांनी मराठीसह बॉलिवूडवरही राज्य केलं. त्यामुळे आज हिंदी इंडस्ट्रीमध्येही त्यांची लोकप्रियता पाहायला मिळते. आजवरच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमा दिलेल्या अश्विनी भावे सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहे. लग्नानंतर त्या कायमस्वरुपी अमेरिकेच स्थायिक झाल्या. त्यामुळे कलाविश्वातील त्यांचा वावर कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या सातत्याने चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात.

सध्या सोशल मीडियावर अश्विनी भावे यांच्या एका जुन्या मुलाखतीची चर्चा रंगली आहे. 'लोकमत'च्या एका सदरात त्यांनी त्यांच्या मुलांच्या संगोपनाविषयी आणि जडणघडणीविषयी भाष्य केलं होतं. यात मुलांना मातृभाषेसह फॉरेन लँग्वेज शिकता यावी यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न कसा फेल गेला हे सांगितलं. त्यांच्या एका चुकीमुळे त्यांच्या मुलाचं बोलणं अचानकपणे बंद झालं होतं.

"समीर लहान असताना मी घरात मराठी बोलत असे. समीरच्या शाळेत इंग्रजी आणि माझी नॅनी समीरशी स्पॅनिश बोलत असे. मला वाटलं मी माझ्या मुलांच्या वाढीसाठी चांगले प्रयत्न करते आहे. तो मातृभाषाही शिकतोय आणि फॉरेन लँग्वेजही. पण अचानकच समीर खूप गप्प गप्प राहायला लागला आणि बोलायचाही बंद झाला. मी घाबरून डॉक्टरकडे गेले. ब-याच प्रश्नोत्तरानंतर त्यांनी सांगितलं की, तीन भाषांमध्ये त्याला फरक करता येत नाही आहे. तुम्ही पुढचं निदान वर्षभर तरी एकाच भाषेत त्याच्याशी बोला. इंग्रजीत बोललात तर जास्त बरं.. माझ्या मुलावर मराठीचे संस्कार करण्यात मी अपयशी झाले होते खरी; पण मी मराठीचा अट्टाहास सोडून दिला तात्पुरता. कारण ती त्याची गरज होती, असं अश्विनी भावे म्हणाल्या.

पुढे त्या म्हणतात, "आज माझा मुलगा स्पॅनिशही उत्तम बोलतो आणि मुंबईतल्या त्याच्या आजीशी मराठीत उत्तम गप्पाही मारतो. पालक म्हणून आपणच फक्त मुलांना शिकवत असतो, हे काही खरं नव्हे. खरं तर मुलंही आपल्याला शिकवत असतातच. त्यांच्याबरोबरच तर आपल्या आईपणाचं वय वाढत जात असतं ना!"

दरम्यान, अश्विनी यांनी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्न केलं असून सध्या त्या अमेरिकेत स्थायिक आहेत. अश्विनी यांनी 'धडाकेबाज', 'अशी ही बनवाबनवी', 'सरकारनामा','कळत नकळत', 'वजीर', 'कदाचित' अशा एकाहून एक सरस मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.याशिवाय ऋषी कपूर यांच्यासह 'हिना' सैनिकमध्ये अभिनेता अक्षय कुमारसह आणि बंधन सिनेमात अभिनेता सलमान खानसह अश्विनी भावे यांनी भूमिका साकारल्या आहेत. 

टॅग्स :अश्विनी भावेसेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूडऋषी कपूर