Join us

"दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीकडे विजय सेतूपती आहे तर आमच्याकडे...", 'आता थांबायचं नाय' चित्रपट पाहून मराठी अभिनेता भारावला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 14:05 IST

सत्य घटनेपासून प्रेरित असलेला शिवराज वायचळ दिग्दर्शित 'आता थांबायचं नाय' या चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे.

Nikhil Chavan Post: सत्य घटनेपासून प्रेरित असलेला शिवराज वायचळ दिग्दर्शित 'आता थांबायचं नाय' या चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. १ एप्रिलच्या दिवशी हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून चित्रपटाचा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधवसह आशुतोष गोवारीकर, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे, प्रवीणकुमार डाळिंबकर, ओम भुतकर, पर्ण पेठे, श्रीकांत यादव आणि रोहिणी हट्टंगडी यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. सध्या सगळीकडे या चित्रपटाचं कौतुक होत आहे. याच चित्रपटाबद्दल मराठी अभिनेता निखिल चव्हाण सुंदर असं वर्णन करत खास पोस्ट लिहिली आहे. 

नुकतेच निखिल चव्हाणने 'आता थांबायचं नाय' चित्रपटातील काही क्षण व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान, या पोस्टला कॅप्शन देत अभिनेत्याने लिहिलंय, "आता थांबायचं नाय... जेंव्हा जेंव्हा मराठी सिनेसृष्टीला उचलून धरायची वेळ आली तेव्हा तेव्हा भरत जाधव सर आणि सिद्धू दादा यांची जोडी एकत्र आली. उत्तम कथानक, उत्तम दिग्दर्शन आणि उत्तम अभिनयाची सांगड म्हणजे आता थांबायचं नाय! मंचेकर म्हणजे सुपरस्टार भरत जाधव सर i love you...". 

पुढे अभिनेत्याने लिहिलं, "दाक्षिणात्य सिनेसृष्टीकडे जर विजय सेतूपती आहे तर आमच्याकडे भरत जाधव आहेत. सिद्धू दादा कमाल काम केलं आहेस. मारुती कदम सोपा न्हवतं पण तू सहज रित्या घेऊन गेलास त्या विश्वात love you..... प्रवीण, प्राजक्ता, किरण लाजवाब..... शिवराजचा पहिला सिनेमा आहे हे अजिबात जाणवलं नाही. मोठा विषय सहजते ने हाताळलास. संविधान इतकं सोपं समजावलंस कि बासच! संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा...!" अशा आशयाची पोस्ट अभिनेत्याने लिहून त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. 

झी स्टुडिओज् प्रस्तुत , झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले,अरविंद जगताप आणि शिवराज वायचळ यांनी केले आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये  २०१६ मध्ये घडलेल्या घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे. नापास कर्मचारी दहावीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वायचळ यांनी रंजकतेने पडद्यावर मांडला आहे. गुलराज सिंग यांचं धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीतलेखन या चित्रपटाला लाभले आहे.  चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, निधी हिरानंदानी व धरम वालिया यांनी केली आहे. तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव प्रोड्यूसर आहेत. 

टॅग्स :मराठी चित्रपटभरत जाधवसिद्धार्थ जाधवमराठी अभिनेतासेलिब्रिटी