Join us  

'माझ्या जन्माच्या वेळी आईने अबॉर्शनचा प्रयत्न केला...' अजिंक्य राऊतचा किस्सा ऐकून वाटेल आश्चर्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 3:04 PM

अजिंक्यची थेट देवाशीच कशी नाळ जुळली आहे वाचा

'मन उडू उडू झालं' मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणारा अभिनेता अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. 'कन्नी' या सिनेमात तो मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर मालिकेतलीच त्याची जोडीदार अभिनेत्री हृता दुर्गुळे सिनेमात मुख्य अभिनेत्री आहे. प्रेक्षकांना अजिंक्य आणि हृता केमिस्ट्री खूप आवडली होती. आता ही जोडी मोठ्या पडद्यावरही आपली जादू दाखवण्यास सज्ज आहे. दरम्यान अजिंक्य राऊतने सिनेमाच्या निमित्त  एक मुलाखत दिली. त्यातील एक किस्सा सध्या व्हायरल होतोय.

अजिंक्य राऊत हा मूळचा परभणी जिल्ह्यातील आहे. अभिनयाची आवड त्याला मुंबईत घेऊन आली. अजिंक्यने त्याच्या जन्माचा एक किस्सा नुकताच शेअर केला आहे. 'मराठी मनोरंजन विश्व'ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "मी जन्माला येण्याच्या वेळेला आईने आर्थिक परिस्थितीमुळे अबॉर्शनचा प्रयत्न केला. आता त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. अबॉर्शनच्या प्रयत्नानंतरही मी जगलो आणि जन्माला आलो. नंतर माझं एक ऑपरेशन झालं तर त्यातही मी वाचलो. माझा जन्म एकादशीचा आहे. असं सगळं झाल्यानंतर घरच्यांचा विश्वास बसला की माझी देवाशी नाळ खूप चांगली जोडली गेली आहे. तुझं हे आयुष्य तुला हवंच होतं. आता ते तुला मिळालं आहे तर तुला जे हवं ते तू कर, तुला जगायचं तसं जग. मी कधीच याचा गैरफायदा घेतला नाही. म्हणून त्यांनी मला कधीच कोणत्या गोष्टीत विरोध केला नाही."

तो पुढे म्हणाला, "मी तसा लहानपणापासूनच गुणी होतो. मी कधी फारशा अवांतर गोष्टी केल्या नाहीत. मी माझ्या मतांच्या बाबतीत खूप ठाम होतो. म्हणजे मला इंजिनिअरिंग करायचंय तर करायचंय. नंतर मला अभिनय करायचाय तर करायचाय. कुटुंबियांनी त्यांच्या आवाक्याबाहेर जाऊन मला खूप मदत केली.त्यांचं नेहमीच मला पाठबळ मिळालं."

अजिंक्यचा 'कन्नी' सिनेमा आज रिलीज झाला आहे. यापुढेही तो काही मराठी सिनेमांमध्ये झळकणार आहे. याआधी तो 'विठू माऊली', 'टकाटक' या प्रोजेक्ट्समध्येही दिसला होता. 

टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकारमराठी चित्रपटसेलिब्रिटी