ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) आणि हृता दुर्गुळे (Hruta Durgule) यांच्या आगामी सिनेमाची चर्चा आहे. 'आरपार' या सिनेमात दोघंही पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या फ्रेश जोडीला एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सिनेमाचा टीझर आला असून ललित आणि हृताची केमिस्ट्री खूप पसंत केली जात आहे. ही एक आरपार लव्हस्टोरी असून प्रेम, विरह अशा भावनांची गुंफण यात घातली गेली आहे.
‘प्रेमात अधलं मधलं काही नसतं, प्रेम हे प्रेम असतं’, अशी टॅगलाईन असलेला हा सिनेमा आहे 'आरपार'. ललित प्रभाकर व हृता दुर्गुळे या दोघांच्याही वाढदिवसादिवशी म्हणजे १२ सप्टेंबर रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचं पहिलं गाणं 'आरपार' हे टायटल ट्रॅक रिलीज झालं आहे. कॉलेजमधील लव्हस्टोरी, समुद्रकिनारचं मनमोहक दृश्य, ललित आणि हृताची केमिस्ट्री असे सीन्स गाण्यात पाहायला मिळत आहेत. ललित खूपच हँडसम दिसत असून हृताही खूप सुंदर दिसत आहे. गाण्याच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत कौतुक केलं आहे.
जितेंद्र जोशी यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर शंकर महादेवन यांनी गाणं गायलं आहे. गुलराज सिंग यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. 'लिऑन्स मीडिया प्रॉडक्शन एलएलपी' प्रस्तुत, निर्माते नामदेव काटकर, रितेश चौधरी निर्मित 'आरपार' हा सिनेमा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद या धुरा गौरव पत्की यांनी सांभाळल्या आहेत. प्रेमाची अनोखी परिभाषा मांडणारा हा रोमँटिक सिनेमा हृता व ललित या नव्या जोडीसह १२ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.