Join us
Daily Top 2Weekly Top 5

गश्मीर महाजनीने मुलासाठी घेतलेत 'हे' कडक निर्णय; घरात टीव्ही पाहण्यावरही आहे बंदी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 16:21 IST

गश्मीरने त्याच्या मुलाच्या जडणघडणीबद्दल आणि शाळेतील अनोख्या नियमांबद्दल काही गोष्टी शेअर केल्या.

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनी हा त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखला जातो. गश्मीरचे कुटुंब, विशेषतः त्याची पत्नी गौरी देशमुख आणि मुलगा व्योम, लाइमलाईटपासून दूर राहणे पसंत करतात. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गश्मीरने त्याच्या मुलाच्या जडणघडणीबद्दल आणि शाळेतील अनोख्या नियमांबद्दल काही गोष्टी सांगितल्या.

लोकमत फिल्मीशी बोलताना गश्मीरने सांगितले की, त्याचा मुलगा व्योम ज्या शाळेत जातो, तिथे घरून डब्बा घेऊन जाण्याची गरज नसते. शाळेतच जेवणाची उत्तम सोय असते. यामागचा नियम सांगताना गश्मीर म्हणाला, "शाळेत दररोज कोणत्या ना कोणत्या मुलाच्या घरून ३० मुलांसाठी जेवण येते. महिन्यातून एकदा प्रत्येक पालकाची ही जबाबदारी असते. यामुळे मुलांना बाहेरचे पदार्थ खावे लागत नाहीत. मुले स्वतःच्या हाताने जेवण वाढून घेतात आणि जेवण झाल्यावर आपली ताटे स्वतः स्वच्छ करून ठेवतात. यात पोळी, भाजी, आमटी, भात आणि सॅलड असा पूर्ण आहार असतो".

घरात टीव्ही पाहण्यावर 'बंदी'
मुलासमोर चुकीचे संस्कार जाऊ नयेत किंवा त्याचे अभ्यासावरून लक्ष विचलित होऊ नये, यासाठी गश्मीरने घरात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गश्मीर आणि त्याचे कुटुंबीय व्योम समोर कधीच टीव्ही पाहत नाहीत. तो म्हणाला, "मी टीव्हीवर जे पाहतो, ते व्योम पाहू शकत नाही. त्यामुळे तो जागा असेपर्यंत आम्ही कोणीही टीव्ही लावत नाही. मला काही पाहायचे असेल किंवा वाचन करायचे असेल, तर मी तो रात्री आठ वाजता झोपल्यानंतरच करतो".

शिस्तीचे आणि जेवणाचे महत्त्व
गश्मीरने त्याच्या घरातील जेवणाच्या वेळांबाबतही माहिती दिली. "आम्ही जेवणाच्या वेळा कधीच चुकवत नाही. जर मी सेटवर नसेन, तर संध्याकाळी साडेसात ते पावणेआठपर्यंत आम्ही जेवण करतो. दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान आमचे जेवण होते. व्योम सकाळी साडेसहा वाजता उठतो आणि आठ वाजता शाळेत जातो", असेही त्याने स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Gashmeer Mahajani's strict parenting: No TV for his son!

Web Summary : Gashmeer Mahajani prioritizes discipline and healthy habits for his son, Vyom. The school provides meals, fostering independence. The family avoids TV when Vyom is awake, and maintains strict meal times to instill good habits.
टॅग्स :गश्मिर महाजनी