क्षिती जोगची भूमिका असलेला हेमंत ढोमे दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' सिनेमा थोड्याच दिवसांमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने क्षितीने एका मुलाखतीत ती प्रत्येक सिनेमात वेगळ्या भूमिका साकारताना परफ्यूम का बदलते याचा खुलासा केलाय. अमोल परचुरेंच्या कॅचअप चॅनलला दिलेल्या मुलाखतीत क्षिती जोग याविषयी खुलासा करताना म्हणाली की, "मला परफ्यूमची खूप आवड आहे. एखादी भूमिका साकारताना ते कॅरेक्टर कोणत्या पद्धतीचं परफ्यूम वापरत असेल याचा मी विचार करते. त्यामुळे जेव्हा एखादी विशिष्ट भूमिका साकारताना शूटला निघायच्या आधी किंवा शूटमध्ये मी ते परफ्यूम लावते. त्यामुळे मी त्या कॅरेक्टरशी कनेक्ट होते."
"आता फसक्लास दाभाडेची तायडी करताना माझं परफ्यूम खूप स्ट्राँग होतं. ते कॅरेक्टर साकारताना अशा गोष्टींची त्या नटाला मदत होते. सगळे करतात की नाही मला माहित नाही. मी कॉलेजमध्ये असताना एक डीओ वापरायचे. मग पैसे कमवायला लागल्यावर थोड्या महागड्या गोष्टी आल्या. अनेक वर्षांनी मला तो डीओ दिसला आणि मी ते वापरलं. तेव्हा नेमकं मी माझ्या कॉलेजच्या काही मित्रांना भेटले. तेव्हा मित्रांना माझ्या परफ्यूममुळे आमच्या जुन्या रिहर्सलच्या दिवसांची आठवण आली."
"त्यानंतर मला कळलं की, बरेच लोक ही गोष्ट करतात. त्यामुळे हे कुठेतरी माझ्या डोक्यात होते. सीरियल्स (मालिका) करताना मी हे करु शकत नाही कारण ते रोज करावं लागतं. पण सिनेमाला मला खूप मदत होते. मला अशी गोष्ट करणारा एक माणूस भेटला तो म्हणजे रणवीर सिंग. तो सुद्धा ही गोष्ट करतो. रॉकी और रानी की प्रेम कहानी करताना रणवीरने एक विशिष्ट परफ्यूम लावलं होतं. रॉकी ये परफ्यूम लगाएगा, असं तो म्हणाला होता. तेव्हा मला सेम पिंच असं झालं."
क्षितीने रणवीर सिंगसोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात त्याच्या आईची भूमिका साकारली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट झाला. याशिवाय क्षितीची भूमिका असलेला 'फसक्लास दाभाडे' सिनेमा ३१ जानेवारी २०२५ ला रिलीज होणार आहे.