Join us  

'माझ्याविषयी मोठे गैरसमज पसरले'; लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

By शर्वरी जोशी | Published: December 07, 2021 5:42 PM

Sharvari lohokare: उत्तम अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारी शर्वरी अचानकपणे या क्षेत्रातून कुठे गायब झाली? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र, चाहत्यांच्या या प्रश्नाचं उत्तर अलिकडेच शर्वरीने मुलाखतीत दिलं आहे. 

कलाविश्वात आजच्या घडीला असंख्य कलाकारांची रेलचेल आहे. काही कलाकार वर्षानुवर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. तर काही नवोदित कलाकार या क्षेत्रात आपलं नशीब आजमावत आहेत. यात असेही काही कलाकार आहेत ज्यांनी एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि त्यानंतर त्यांचा कलाविश्वातील वावर अचानकपणे कमी झाला. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे शर्वरी लोहकरे. असंख्य नाटकं, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या शर्वरीचा मध्यंतरी कलाविश्वातील वावर कमी झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे उत्तम अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारी शर्वरी अचानकपणे या क्षेत्रातून कुठे गायब झाली? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र, चाहत्यांच्या या प्रश्नाचं उत्तर अलिकडेच शर्वरीने 'लोकमत ऑनलाइन'च्या मुलाखतीत दिलं आहे. 

'माझ्याविषयी निर्माण झालेले गैरसमज आणि कम्युनिकेशन गॅप या दोन मुख्य कारणांमुळे माझा कलाविश्वातील वावर कमी झाला', असं तिने या मुलाखतीत सांगितलं. तसंच आयुष्यात आलेल्या असंख्य चढउतारांवरही भाष्य केलं.

"मुळात कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आपली सगळ्यांची ध्येय ठरलेली असतात. परंतु, माझ्या बाबतीत थोडंसं उलटं झालं. कारण, अगदी कॉलेजमध्ये असतांनाच मला पहिली मालिका मिळाली.त्यावेळी मी कॉलेजमध्ये नाटक किंवा अन्य कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायचे पण मला अभिनेत्री व्हायचंय किंवा याच क्षेत्रात यायचंय हे ठरलं नव्हतं. मी ऑडिशन देत होते. मात्र, याच क्षेत्रात करिअर करायचंय हे कधीच निश्चित केलं नव्हतं. काम मिळत होतं आणि मी ते करत होते. मी टीवायला असतांना 'या सुखांनो या' ही मालिका मिळाली आणि या मालिकेने मला खूप काही दिलं. अभिनयाची प्रत्येक रंगछटा मला या मालिकेच्या माध्यमातून करता आल्या. त्यानंतर मला काही मालिकांच्या ऑफर्सही मिळाल्या. पण, काही वेळा कथानक वा अन्य गोष्ट जुळून न आल्यामुळे या भूमिकांना मी नकार दिला. मात्र, याचवेळी माझ्याविषयी गैरसमज पसरण्यास सुरुवात झाली", असं शर्वरी म्हणाली.

'सूर्यवंशी'च्या सेटवर मराठी अभिनेत्रीला मिळाली अशी वागणूक; स्वत:च केला खुलासा

पुढे ती म्हणते, "खरंतर माझ्याविषयी गैरसमज पसरत असताना मला त्याविषयी जराही कल्पना नव्हती. त्यामुळे हे गैरसमज वेगाने पसरु लागले. मी एखाद्या मालिकेला नकार दिला तर मग मला मालिका करायच्याच नाहीत. मी चित्रपटांची वाट पाहतीये असं अनेकांना वाटलं. तर अनेकदा असंही झाली की, मी चित्रपट नाकारला तर दिग्दर्शक, निर्मात्यांना वाटायचं मी अभिनय सोडून लेखनाकडे वळले आहे. वा, माझी काही वैयक्तिक कारणं आहेत ज्यामुळे मला आता अभिनय क्षेत्रात राहायचंच नाहीये.असे एक ना अनेक गैरसमज माझ्याविषयी पसरले. पण, अशी कोणतीही कारणं खरं तर नव्हती. पण हे गैरसमज वाढत राहिले. त्यामुळे कालांतराने ऑफर्स येणं बंद झालं आणि माझा कलाविश्वातील वावर कमी झाला."

'या सुखांनो या'मधील कस्तुरी आठवते का? अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'मध्ये साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका

दरम्यान, कलाविश्वातून काही काळ दुरावलेली ही लोकप्रिय अभिनेत्री पुन्हा एकदा नव्या जोमाने आणि उत्साहाने प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. अलिकडेच तिची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला सूर्यवंशी चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर लवकरच ती एका नव्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमासूर्यवंशीटेलिव्हिजन