Join us  

"हळवा कोपरा....." गाणे सोशल मीडियावर हिट, वडील-मुलाच्या नात्याची हळवी कहाणी रूपेरी पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2018 3:55 PM

वडील लोकेश आणि आई चैत्राली यांच्या पावलावर पाऊल टाकत शुभवी लोकेश गुप्ते चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. लोकेश विजय गुप्ते दिग्दर्शित 'एक सांगायचंय.... Unsaid Harmony' या चित्रपटातून शुभवीच्या अभिनयाचा प्रवास सुरू होत आहे.

अभिनेता केके मेननचं मराठीतलं पदार्पण, अभिनेता लोकेश विजय गुप्तेचं दिग्दर्शकीय पदार्पण म्हणून 'एक सांगायचंय.......Unsaid Harmony हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.वडील आणि मुलातलं नातं अव्यक्त असतं. या अव्यक्त नात्याला शब्दांतून मांडत या नात्याची हळवी कहाणी आता गीतरुपानं प्रेक्षकांपुढे आली आहे. 'हळवा कोपरा तुझा कोणता सांग ना' असे शब्द असलेलं हे गीत वडील मुलाच्या नात्यातली अव्यक्त भावना नेमक्या शब्दांत व्यक्त करतात.सोशल मीडियावर  उत्तम  प्रतिसाद मिळत असून हे गाणं नक्कीच रसिकांच्या ह्रदयाचा ठाव घेईल असा विश्वास चित्रपटाच्या टीमला आहे. 

जितेंद्र जोशीचे शब्द, शैलेंद्र बर्वेचं संगीत आणि अवधूत गुप्ते, बेला शेंडे, राशी हरमळकरचा आवाज असा योग जुळून आलाय. देवी सातेरी प्रॉडक्शननं "एक सांगायचंय... Unsaid Harmony" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात केके मेनन, राजेश्वरी सचदेव यांच्यासह पद्मावती राव, मिलिंद फाटक, विनीत शर्मा, शाल्व किंजवडेकर, शुभवी गुप्ते, विभव राजाध्यक्ष, अभिजित अमकर, हर्षिता सोहल, अजित भुरे आदींच्या चित्रपटात भूमिका आहेत. ऑस्कर विजेत्या रेसूल पुकुट्टीनं चित्रपटाच्या ध्वनी आरेखनाची जबाबदारी सांभाळली आहे, तर पुष्पांक गावडेनं सिनेमॅटोग्राफी केली आहे. लोकेश विजय  गुप्तेनं या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह त्याचं लेखन, संकलनही केलं आहे. तर चैत्राली गुप्तेनं चित्रपटाच्या वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे. नातेसंबंधांबाबतची एक अत्यंत संवेदनशील कथा या सिनेमात पहायला मिळणार आहे. 

वडील लोकेश आणि आई चैत्राली यांच्या पावलावर पाऊल टाकत शुभवी लोकेश गुप्ते चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. लोकेश विजय गुप्ते दिग्दर्शित 'एक सांगायचंय.... Unsaid Harmony' या चित्रपटातून शुभवीच्या अभिनयाचा प्रवास सुरू होत आहे. चित्रपटातील पदार्पणाविषयी शुभवी म्हणाली, 'चित्रपटात माझ्याच वयाच्या एका मुलीची भूमिका चित्रपटात आहे, हे मला माहीत होतं. पण बाबाला कधी सांगितलं नाही, की मला काम करायचंय. एके दिवशी अचानक बाबाच मला येऊन म्हणाला, 'हाय इरा, कशीयेस? मग मी हसले. पण त्याने मला ऑडिशन द्यायला लावली. ऑडिशननंतर माझी कार्यशाळा झाली. स्क्रीप्टचं टीमबरोबर वाचन झालं. या सगळ्याचा मला चित्रीकरणावेळी फायदा झाला. तसंच सगळ्यांनीच खूप मदत केल्यामुळे मला पाहिल्यांदाच काम करत असल्यासारखं वाटलंच नाही.'

टॅग्स :एक सांगायचंय....UNSAID HARMONYके. के. मेनन