Join us

‘डोक्याला शाॅट’चा भन्नाट टिझर प्रदर्शित, या कलाकरांच्या आहेत भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 09:56 IST

हा सिनेमा मैत्री, प्रेम, लग्न या विषयवार आधारित आहे, याचा अंदाज येतो. त्यातही दोन भिन्न भाषिक लग्न करणार असल्याने मित्रांना वेगळीच चिंता सतावत असल्याचेही टिझरमध्ये दिसत आहे.

मराठी सिनेसृष्टीला एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे 'अ व्हिवा इनएन प्रॉडक्शन' आता लवकरच शिवकुमार पार्थसारथी दिग्दर्शित 'डोक्याला शॉट' हा भन्नाट चित्रपट घेऊन येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. यात गणेश पंडित, सुव्रत जोशी आणि प्राजक्ता माळीच्या लग्नाबद्दल बोलताना दिसत आहेत. यावरून हा सिनेमा मैत्री, प्रेम, लग्न या विषयवार आधारित आहे, याचा अंदाज येतो. त्यातही दोन भिन्न भाषिक लग्न करणार असल्याने मित्रांना वेगळीच चिंता सतावत असल्याचेही टिझरमध्ये दिसत आहे.

 

तरूण पिढीला लग्नाच्या आधी आणि नंतर वाटणारी भीती, हुरहूर, तणाव, जबाबदारी याचे दर्शन या टिझरमधून घडत आहे. तरुणांची ही स्थिती दिग्दर्शकाने अतिशय रंजक आणि मार्मिक पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. ज्यांचे लग्न होणार आहे आणि ज्यांचे लग्न झाले आहे, अशा प्रत्येक जोडप्याला हा चित्रपट स्वानुभवाची जाणीव करून देईल. याआधीही 'लग्न आणि मैत्री’ या विषयावर अनेक चित्रपट येऊन गेले. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या डोक्याला नक्कीच शॉट देईल. उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित आणि सुमन साहू चित्रित हा सिनेमा १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात सुव्रत जोशी, प्राजक्ता माळी, गणेश पंडित यांच्यासह रोहित हळदीकर, ओमकार गोवर्धन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

अभिनेता सुव्रत जोशीने नुकताच इन्स्टाग्रामवर एका फोटो शेअर केला होता.या फोटोसोबत सुव्रतने लिहिले होते की, डोक्याला शॉट मधल्या एका गाण्याच्या चित्रीकरणासाठी दोन दिवस वसईमध्ये आहे आणि इथे डोक्याला शांती मिळते आहे. वसई किती सुंदर आहे! शांत, रम्य, समृद्ध आणि बहुसांस्कृतिक! कुठल्याही रस्त्यावर दोन मिनिटे चाललो तरी गोव्यात आल्यासारखे वाटते. मुंबईपासून इतके जवळ असूनही मुंबईच्या बचबचीतून अलिप्त राहिलोय असे वाटते. 

टॅग्स :सुव्रत जोशी