आनंद दिघे हे ठाण्याचे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे धर्मवीर म्हणून ओळखले जातात. 'धर्मवीर' सिनेमामुळे आनंद दिघेंची ओळख जगभरात पोहोचली. सध्या राजकीय क्षेत्रात आणि मनोरंजन विश्वात असलेले अनेक दिग्गज व्यक्तिमत्व आनंद दिघेंच्या जवळ होते. त्यापैकी एक कलाकार म्हणजे अभिजीत पानसे. 'रेगे' सिनेमातून अभिजीत पानसेंनी मराठी सिनेसृष्टीला एक माईलस्टोन सिनेमा दिला. अभिजीत पानसेंनी आनंद दिघेंची भावुक आठवण शेअर केली आहे.
अमोल परचुरेंच्या कॅचअप चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत पानसे म्हणाले, ''वंदे मातरम नाटकाच्या रिहर्सलला आनंद दिघे साहेब आले होते, तेव्हा माझा गोंधळ उडाला होता. नंतर ते प्रयोगाला आले. गणेश दर्शन स्पर्धेच्या आधीचा जो कार्यक्रम होता तो मी बसवला होता. तेव्हा मनोहर जोशी सर लोकसभा अध्यक्ष होते. असं म्हणतात ना, दिघे साहेब आता नाहीयेत तर मी कसा त्यांच्या जवळ वगैरे होतो, तर असं नाहीये. एवढा जवळ वगैरेचा भाग नाहीये, पण निश्चित मी मला त्यांचा सहवास लाभला.''
''दिघे साहेबांबरोबर मी ऑडिओ कॅसेट केली. उदय सबनीस यांनी त्याचं निवेदन केलं होतं. त्या कॅसेटमध्ये त्यांची बायोग्राफी होती. ती फार त्यांना आवडलेली. पण माझा राजकीय काही संदर्भ नव्हता. गणेश दर्शन स्पर्धेचे परीक्षक आम्ही होतो त्यावेळेला दिघे साहेबांचा अपघात झाला होता. माझ्या पुढच्या गाडीत दिघे साहेब होते तेव्हा वंदनाच्या इथे तो अपघात झाला. आम्ही उजवीकडे वळून गडकरीला गेलो होतो.'' अशाप्रकारे अभिजीत पानसेंनी आनंद दिघेंबद्दलची भावुक आठवण शेअर केली आहे. अभिजीत पानसे लवकरच एक नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत.