Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिमानास्पद! ऑस्करने घेतली मराठी सिनेमाची दखल, मुख्य श्रेणी स्पर्धेत 'दशावतार'ची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 14:02 IST

सिने इंडस्ट्रीसाठी सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत 'दशावतार' सिनेमाचीही निवड झाली आहे. 'दशावतार' सिनेमाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सोशल मीडियावरुन ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. 

२०२५ ज्या मराठी सिनेमाने गाजवलं तो म्हणजे बाबू मेस्त्रीचा 'दशावतार'. कोकणाची परंपरा दाखवत महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणारा 'दशावतार' प्रेक्षकांना भावला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती. आता 'दशावतार' ऑस्कर गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. मराठी सिनेसृष्टीसाठी ही आनंदाची बाब आहे. सिने इंडस्ट्रीसाठी सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत 'दशावतार' सिनेमाचीही निवड झाली आहे. 'दशावतार' सिनेमाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सोशल मीडियावरुन ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. 

सुबोध खानोलकर यांनी एक मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. "नमस्कार सुजय... 'दशावतार' आता ऑस्कर स्क्रिनिंग रुममध्ये लाइव्ह दिसेल. धन्यवाद" असं या मेसेजमध्ये लिहिलं आहे. हा मेसेज शेअर करत सुबोध खानोलकर यांनी पोस्ट लिहिली आहे. "कष्टांचं, प्रामाणिकपणाचं, मोठं स्वप्नं पाहण्याचं चीज होतंच… फक्त कामावर विश्वास हवा, खाली मान घालून कष्ट करत राहण्याची चिकाटी हवी, पडल्यावर पुन्हा उभं राहण्याची जिद्द हवी आणि विश्वास ठेवणाऱ्या माणसांची खंबीर साथ हवी", अशा भावना त्यांनी पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत. 

"आज ‘दशावतार’ ऑस्करच्या म्हणजेच अकॅडमी अवॉर्ड्सच्या मुख्य स्पर्धेत (Main open film category - contention list) निवडला गेल्याचा मेल आला आणि गेली अनेक वर्ष आम्ही सगळ्यांनी जी मेहनत घेतली त्याची दखल घेतली गेल्याचं समाधान मिळालं. हे समाधान फक्त ‘दशावतार’ निवडला गेलाय म्हणून नाहीये, तर आपला मराठी चित्रपट जागतिक स्तरावर तोडीस तोड उभा राहू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय म्हणून आहे. मुख्य स्पर्धेच्या कॅटेगिरीत निवडला गेलेला ‘दशावतार’ हा बहुदा पहिलाच मराठी चित्रपट आहे. हजारो चित्रपटातून जे १५०+ चित्रपट निवडले गेलेत त्यातला हा एकमेव मराठी चित्रपट आहे. आणि Academy Screening Room मध्ये दाखवला जाणारा पहिलाच मराठी चित्रपट आहे", असंही त्यांनी पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे. 

पुढे ते म्हणतात, "जिंकणं हरणं नंतरची गोष्ट. पण मुख्य जागतिक प्रवाहात मराठी चित्रपटाची दखल घेतली जाणं हे प्रचंड अभिमानास्पद आहे! ही फक्त सुरवात आहे, आम्ही सातत्याने चांगलं काहीतरी तयार करण्याचा आणि ते जगासमोर आणून मराठीची मान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहू! प्रेम आणि आशीर्वाद असू द्या". आता 'दशावतार' सिनेमाला ऑस्करमध्ये नामांकन मिळेल का, यासाठी सगळे उत्सुक आहेत. या सिनेमात दिलीप प्रभावळकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदुलकर, महेश मांजरेकर, अभिनय बेर्डे यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : 'Dashavatar' selected for Oscars main category, proud moment for Marathi cinema!

Web Summary : Marathi film 'Dashavatar', showcasing Kokan's tradition, is selected for Oscars main competition. Director Subodh Khanolkar shared the news, expressing pride in Marathi cinema's global recognition. It's a proud moment for the Marathi film industry.
टॅग्स :ऑस्करदिलीप प्रभावळकर मराठी अभिनेतासिनेमा