Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमवीरांची 'दांडी गुल' या गाण्याला मिळते तुफान पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 08:00 IST

कॉलेज जीवनातील आणि ते पण हॉस्टेल मध्ये राहत असताना केली जाणार धमाल या गाण्यात दिसून येत आहे. या  गाण्याचे  सुजित कुमार यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे.

प्रेमावर आधारित असलेल्या 'प्रेमवारी' या चित्रपटाचे एक धमाल असे 'दांडी गुल' गाणे प्रदर्शित झाले आहे. उडत्या चालीचे हे गाणे अमितराज, आदित्य पाटेकर आणि हर्षवर्धन वावरे यांनी स्वरबद्ध केले असून अमितराज यांनी संगीतबद्ध केले आहे. 'कितीबी घासली नशिबाने ठासली सक्सेस देतया हूल' असे हटके शब्द एकत्रित गुंफून हे गाणं गुरु ठाकूर यांनी शब्दबद्ध केले आहे. इंजिनीरिंगला शिकणारी ही मुलं हॉस्टेलमध्ये राहताना जी काय मजा मस्ती करतात त्याचे अचूक चित्रण या गाण्यात करण्यात आले आहे. कॉलेज जीवनातील आणि ते पण हॉस्टेल मध्ये राहत असताना केली जाणार धमाल या गाण्यात दिसून येत आहे. या  गाण्याचे  सुजित कुमार यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे.

 

'दांडी गुल' हे गाणं कोपरगाव येथील संजीवनी कॉलेजमध्ये शूट झाले आहे. तसेच गाण्याचा काही भाग त्र्यंबकेश्वर येथे सुद्धा शूट झाला. हे गाणं चित्रित करताना चित्रपटाच्या टीमला पावसाचा खूप अडथळा येत होता. जेव्हा जेव्हा गाणं शूट करण्यासाठी टीम कॅमेऱ्यासह तयार व्हायची नेमका तेव्हाच पाऊस सुरु व्हायचा आणि जेव्हा  टीम कॅमेऱ्यासह गाडीत बसायचे तेव्हा पाऊस थांबायचा असं अनेक वेळा झालं. शेवटी सिनेमाच्या टीमने कॅमेरा प्लँस्टिक कव्हरने पूर्ण झाकला आणि गाण्याचे चित्रीकरण पूर्ण केले. या कव्हर मुळे पाऊस असतानासुद्धा गाणे शूट करण्यात आले. 'प्रेमवारी' सिनेमाच्या मागील सर्व गाण्यांना मिळालेल्या भरघोस प्रतिसादाप्रमाणे या गाण्यालाही रसिक उत्तम प्रकारे प्रतिसाद देतील यात शंका नाही. प्रेमावर आधारित असलेल्या आणि प्रेमाची नवीन परिभाषा सांगणारा हा सिनेमा येत्या ८ फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. फेब्रुवारीचा पहिला आठवडा आणि प्रेमावर आधारित 'प्रेमवारी' चित्रपट. हा उत्तम योग जुळून येत आहे. 

या चित्रपटात प्रेक्षकांना चिन्मय उदगीरकर, मयुरी कापडणे, अभिजित चव्हाण, भारत गणेशपुरे यांच्या या  प्रमुख भूमिका आहेत. साईममित प्रोडक्शन निर्मित ‘प्रेमवारी’ या चित्रपटाची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले असून,प्रस्तुतीही त्यांचीच आहे. प्रेमाचे महत्व अधोरेखित करणारा हा चित्रपट प्रेमाच्या महिन्यात अर्थात ८ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.