आज गोकुळाष्टमी सणाचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून लपून बसलेल्या पावसाने मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार हजेरी लावली आहे. या पावसातही गोविंदांचा उत्साह काही कमी झालेला नाही. दरवर्षी गोकुळाष्टमीला हमखास पाऊस पडतोच. यावर्षीही पाऊस गोविंदांसोबत दहीहंडी सणाचा आनंद घेण्यासाठी सज्ज आहे. यावरच स्पृहा जोशीने खास कविता लिहिली आहे.
स्पृहा जोशीची कविता
दर गोकुळाष्टमीला तू बरोब्बर पाऊस घेऊन कसा येतोस? की पाऊस होऊन येतोस? सगळं विज्ञान, भूगोल लॉजिक आहेच पण आजच्या दिवशी तुला त्यात बांधावंसं नाही वाटत! उगाचच आज तुझ्याशी भांडावंसं नाही वाटत! तसंही बांधाल तितकं बंधन तोडून लांब जाण्याचंच खूळ तुला...मग तुझे नको ते लाड पुरवण्याची बुद्धी कशाला देतोयसआमच्या इंटेलेक्चुअल बुद्धीला? त्यापेक्षा तुझं विश्वरुप दर्शन...ते पेरलं असतंस आमच्या डोळ्यात...तुझा सारासार विचार टोचला असतास आमच्या बुद्धीला...आपल्या माणसांना काठावर ठेवण्याची शक्ती दिली असतीस...किमान तुझी गूढ निळाईची एखाद रंगछटा दिली असतीस...असो जिथे आहेस तिथे खुशाल अस!इथली फार काळजी करू नको...दर गोकुळाष्टमीला असा पाऊस पाठवत राहा फक्तबाकी आमचं काही फार मनावर घेऊ नको...
स्पृहा जोशीने तिच्या सोशल मीडियावरुन ही कविता शेअर केली आहे. तिच्या या कवितेवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्पृहा जोशीची ही कविता चाहत्यांच्या पसंतीत उतरली आहे.