Join us

अपयशानंतर पार्टी का करतो अमेय वाघ? वाचा नेमकं काय म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 14:04 IST

अमेय वाघचा हटके फंडा, अपयशही साजरं करतो!

Amey Wagh Celebrate Failure: अमेय वाघ (Amey Wagh) हा सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अमेयनं आजपर्यंत विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मराठीसह हिंदीतही काम करणारा प्रभावी अभिनेता म्हणून त्यानं आपली ओळख निर्माण केली आहे. सिनेसृष्टीत प्रत्येक कलाकाराला यशासोबतच अपयशाचा सामना करावा लागतो. काही संधी मिळतात, तर काही हातातून निसटतात. अशावेळी मानसिक अवस्था खचते. पण अशा क्षणीही त्या अपयशाला हसत सामोरं जाण्याचा सकारात्मक दृष्टिकोन अमेय वाघ ठेवतो. नुकतंच अमेयनं एका मुलाखतीमध्ये तो मित्रपरिवारासोबोत कसं अपयशही साजरं करतो, याबद्दल सांगितलं.

अमेय वाघ हा 'शिट्टी वाजली रे' या नव्या कोऱ्या रिअ‍ॅलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अमेय वाघ या शोचं सूत्रसंचालन करताना दिसत आहे. याच निमित्ताने अभिनेत्याने अलिकडेच 'मटा कट्टा'ला मुलाखत दिली. यावेळी त्यानं अपयशावर भाष्य केलं. तो म्हणाला, "माझा मित्रपरिवार हा खूप मोठा आहे. कॉलेजपासूनचा माझा पुण्यातला ग्रुप आहे. त्यात एक नियम आहे, आम्ही अपयशाची पार्टी देतो. एखाद्याचं काही काम चाललं नसेल, कोणाला व्यवसायात नुकसान झालं असेल, तर ती पार्टी द्यायची आणि अपयश विसरायचं. फक्त यश मिळालं तर ते साजरं करायचं असं नाही, अपयशही साजरं करायचं. सगळ्यांच्या साथीनं अपयश विसरायला मदत होते. तर मीदेखील वर्षातून बऱ्याचवेळा अपयशाची पार्टी देतो", असं त्यानं सांगितलं.

याच मुलाखतीमध्ये अमेयनं 'शिट्टी वाजली रे' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यासाठी होकार देण्यामागचं कारणही सांंगितलं. तो म्हणाला, "मला सूत्रसंचालनाची आवड होतीच. ते करताना तुम्ही माणूस म्हणून समोर येता. विनोदबुद्धी, हजरजबाबीपणा या सगळ्या गोष्टींचा कस लागतो. सूत्रसंचालकावर कार्यक्रम पुढे घेऊन जायची जबाबदारी असेल असं काही करायचं होतं. स्टार प्रवाह वाहिनीच्या टीमसोबत कधीतरी याबद्दल बोललो होतो. ते लक्षात ठेवून त्यांनी मला विचारलं. मनासारखं काम मिळाल्यामुळे 'शिट्टी वाजली रे' कार्यक्रमाला होकार दिला".

छोट्या पडद्यापासून ते मोठा पडदा

अमेय वाघचा छोट्या पडद्यापासून ते मोठा पडदा असा त्याचा प्रवास राहिला. त्याने मराठी चित्रपटसृष्टीत एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. 'फास्टर फेणे', 'मी वसंतराव', 'गर्लफ्रेंड', 'अनन्या', 'धुरळा' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांत तो झळकला. 'काला पानी', 'असूर २'या वेब सीरिजमध्येही तो झळकला आहे. या दोन्ही सीरिजमधील त्याच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं होतं. तसेच 'द ग्रेट इंडियन मर्डर', 'कार्टेल' या वेबसीरिजमध्येही त्यानं काम केलं आहे.

टॅग्स :अमेय वाघस्टार प्रवाहसेलिब्रिटीमराठी अभिनेता