Join us
Daily Top 2Weekly Top 5

अलका कुबल, विजय पाटकर, प्रिया बेर्डे यांच्यासह ११ जणांना 'मानाचा मुजरा'चे १० लाख भरण्याचे देण्यात आले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 12:39 IST

मानाचा मुजरा कार्यक्रम गैरव्यवहारातील १० लाख ७८ हजार रुपये पंधरा दिवसात भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

ठळक मुद्दे‘खात्यामध्ये भरा’ ऐवजी ‘खात्यामधून भरा’, असा शब्द टाईप झाल्याने त्याचा संचालकांनी वेगळा अर्थ काढला. मात्र, अखेर आज धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दुरुस्ती करत या संचालकांना पैसे भरण्याचे आदेश दिले आहेत.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या तत्कालीन संचालक मंडळातील अलका कुबल, अभिनेता विजय पाटकर, दिग्दर्शक विजय कोंडके, अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासह ११ जणांना धर्मादाय आयुक्तांनी दणका दिला आहे. मानाचा मुजरा कार्यक्रम गैरव्यवहारातील १० लाख ७८ हजार रुपये पंधरा दिवसात भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

टायपिंगमध्ये झालेल्या काही चुकींचा गैरफायदा घेत या तत्कालीन मंडळींनी पैसे लाटल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, अभिनेता विजय पाटकर, दिगदर्शक विजय कोंडके, अभिनेत्री अलका कुबल, प्रिया बेर्डे, मिलिंद अष्टेकर, सुभाष भुरके, सतिश बिडकर यांच्यासह ११ जणांना हे आदेश लागू करण्यात आले आहेत. तत्कालीन संचालक मंडळाने १० लाख ७८ हजार रुपये  इतकी रक्कम येत्या १५ दिवसात भरली नाही, तर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. हा आदेश धर्मादाय सहआयुक्त श.ल. हर्लेकर यांनी दिला आहे.

२०१० ते २०१५ या कालावधीत मानाचा मुजरा हा कार्यक्रम झाला होता. यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप स्पष्ट झाला होता. मात्र, टायपिंगमध्ये झालेल्या चुकीचा फायदा घेत हे पैसे अद्याप भरले गेले नव्हते. ‘खात्यामध्ये भरा’ ऐवजी ‘खात्यामधून भरा’, असा शब्द टाईप झाल्याने त्याचा संचालकांनी वेगळा अर्थ काढला. मात्र, अखेर आज धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दुरुस्ती करत या संचालकांना पैसे भरण्याचे आदेश दिले आहेत. भास्कर जाधव, प्रमोद शिंदे, रणजीत जाधव यांनी धर्मादाय आयुक्तांकडे आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तक्रार केली होती.

या आदेशाने दिलेल्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे मागील कार्यकारणीच्या वतीने तत्कालीन उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. 

 

टॅग्स :अलका कुबलप्रिया बेर्डेविजय पाटकर