Join us
Daily Top 2Weekly Top 5

​'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये स्पृहा जोशीची जागा घेणार ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 10:17 IST

उमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा कोणती अभिनेत्री घेणार? ही बऱ्याच ...

उमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा कोणती अभिनेत्री घेणार? ही बऱ्याच दिवसांपासून लागलेली उत्कंठा आता संपली आहे. कारण नाट्यरसिकांकडून अनेक तर्कवितर्क केल्या जाणाऱ्या या भूमिकेसाठी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री स्वानंदी टिकेकरचे नाव आता निश्चित झाले आहे. विलेपार्ले येथील दिनानाथ नाट्यगृहात नुकत्याच पार पडलेल्या या नाटकाच्या २७५व्या प्रयोगानंतर उमेश-स्पृहाद्वारे करण्यात आलेल्या फेसबुक लाईव्हमधून स्वानंदीच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यामुळे आगामी काळात या नाटकामधून स्पृहाऐवजी स्वानंदी उमेशबरोबर रंगभूमी शेअर करताना दिसून येणार आहे. चांगलं बुकिंग घेत असलेल्या खूप कमी मराठी नाटकांमधील एक असणाऱ्या या नाटकातील नव्या प्रणोतीबद्दल बोलताना स्पृहाने अशी माहिती दिली की, 'या नाटकाचा आज झालेला २७५ वा प्रयोग माझा शेवटचा प्रयोग असून यापुढे स्वानंदी टिकेकर माझी भूमिका करताना तुम्हाला दिसेल. माझ्या काही प्रोफेशनल कमिंट्समेंटमुळे मला हे नाटक सोडावं लागतंय. पण, हे नाटक आजच्या काळाचं महत्वाचं नाटक आहे. या नाटकाचा विषय खूप महत्वाचा असल्यामुळे माझ्या नसण्याने एक चांगला विषय बंद होणं योग्य नाही. त्यामुळे या नाटकाच्या पुढील प्रवासात माझ्या जागेवर स्वानंदी टिकेकर हा नवा चेहरा तुमच्यासमोर येणार आहे. माझ्या भूमिकेवर जसे भरभरून प्रेम केले अगदी तसेच प्रेम तुम्ही स्वानंदीवर देखील कराल अशी मी आशा करते'.'डोण्ट वरी बी हॅप्पी' नाटकातील या महत्वपूर्ण बदलाबद्दल सांगताना स्पृहा एक मेहनती अभिनेत्री असून तिच्यासोबतचा पार केलेला या नाटकाचा दीर्घ प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय असल्याचे उमेश सांगतो. तसेच प्रणोतीच्या भूमिकेत दिसणाऱ्या स्वानंदीबद्दल बोलताना स्वानंदी हुशार आणि कुशल अभिनेत्री असून तिच्यासोबत काम करायला आपण खूप उत्सुक असल्याचे त्याने सांगितले.पती-पत्नीचे नातं आणि जगण्यातला स्ट्रेस यावर भाष्य करणाऱ्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकाने मराठी रंगभूमीवर यशस्वी कामगिरी केली आहे. सोनल प्रॉडक्शन्सच्या नंदू कदम निर्मित मिहीर राजदा लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नाटकातील उमेश- स्पृहाची जोडीदेखील प्रेक्षकांमध्ये हिट ठरली होती. त्यामुळे स्पृहाने गाजवलेल्या या भूमिकेला न्याय देण्याचे आव्हान स्वानंदीवर असणार आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना स्वानंदी असे सांगते की, 'प्रणोतीची भूमिका माझ्यासाठी खूप चॅलेन्जिंग जरी असली तरी नाटकाच्या संपूर्ण टीमकडून मिळत असलेल्या प्रोत्साहनामुळे मला या भूमिकेसाठी कोणत्याही प्रकारचे दडपण आले नाही. उलट मी या भूमिकेचा आनंदच अधिक लुटत आहे. माझे एवढेच उद्दिष्ट असेल की, या नाटकाची स्क्रिप्ट आणि पटकथेला मी योग्य न्याय देऊ शकेन. उमेश आणि स्पृहा अभिनयाच्या बाबतीत कमालीचे असून, हे दोघेही मला खूप प्रिय आहेत. त्यामुळे या दोघांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास मला कायम राखायचा आहे'.'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेच्या पहिल्या भागापासूनच लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या स्वानंदीने यापूर्वीच आपल्या अभिनय कौशल्याद्वारे स्वतःचा खास प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. शिवाय सुमित राघवनसोबत '१०३' या नाटकाद्वारे तिने रंगभूमीदेखील गाजवली असल्याने स्वानंदी नाट्यरसिकांना आपल्या अभिनयाद्वारे 'डोण्ट वरी बी हॅप्पी' ठेवण्यास नक्कीच यश मिळवेल अशी आशा आहे. Also Read : उमेश कामत सांगतोय प्रिया बापटने त्याच्या वाढदिवसाला दिले होते हे सरप्राईज