71st National Film Awards: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज(मंगळवार २३ सप्टेंबर) दिल्लीत ७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी बालकलाकारांनी डंका वाजवला. ५ बालकलाकारांना हा पुरस्कार देण्यात आला. तर त्यापैकी ४ बालकलाकार हे मराठी आहेत.
नाळ २ सिनेमातील त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोळके, भार्गव जगताप यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने गौरविण्यात आले. तर जिप्सी सिनेमातील कबीर खांडारे यालाही सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्काराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुकृती वेणी बंडरेड्डी या तेलुगु बालकलाकाराला गांधी तथा चेत्तु सिनेमासाठी पुरस्कार देण्यात आला. श्रीनिवास पोकळेचा हा दुसरा राष्ट्रीय पुरस्कार आहे.
राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेल्या चिमुकल्या त्रिशाने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली. त्रिशा साडी नेसून राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी आली होती. तिचा आत्मविश्वास पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. टाळ्यांच्या गडगडाटात त्रिशा सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं. तर कबीर खांडारेनेदेखील धोतर, फेटा असा मराठमोळा पोषाख करत राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला.
'नाळ २' सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारात डंका मारला आहे. या सिनेमाने तब्बल ५ पुरस्कार नावावर केले आहेत. सर्वोत्कृष्ट बालचित्रपटासाठी 'नाळ २'ला गौरविण्यात आले तर दिग्दर्शकालाही राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर तीन बालकलाकारांना सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार मिळाले.