Ketki Mategaonkar: मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय गायिका,अभिनेत्री म्हणजे केतकी माटेगावकर (Ketki Mategaonkar). 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या सिंगिग रिअॅलिटी शोमुळे ती घराघरात पोहोचली. 'काकस्पर्श', 'शाळा', 'टाईमपास' आणि 'तानी' यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून तिने चाहत्यांच्या आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. परंतु या 'टाईमपास' चित्रपटात तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने 'टाईमपास' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानचे काही किस्से शेअर केले.
अलिकडेच केतकी माटेगावकरने अभिनेत्री कांचन अधिकारी यांच्या 'बातों बातों में' या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. त्यावेळी केतकीने तिच्या अभिनय आणि सांगीतिक प्रवासावर भाष्य केलं. त्यादरम्यान, अभिनेत्री म्हणाली, "झालं असं होतं की 'मला वेड लागले प्रेमाचे' या गाण्याचं शूटिंग आम्ही करत होतो. त्यावेळी वेगवेगळ्या कॉस्च्यूम्समध्ये आम्हाला ते गाणं शूट करायचं होतं. तर प्रत्येक वेळेला नवीन ड्रेस घालावा लागत होता. त्यात माझे केस लांब असल्यामुळे ते वाळवणं फार अवघड होते. तिथे तेव्हा सेटवर टॅंकर बोलवून पाऊस पाडला जायचा. पुढे केतकी म्हणाली, जिथे हे शूटिंग सुरु होतं तिकडे डेंग्यूची साथ होती. सगळ्यांनी आपल्या परीने काळजी घेत शूट करत होते. तेव्हा रवी सरांनी मला खूप प्रोटेक्ट केलं."
'टाईमपास'च्या सेटवर नेमकं काय घडलं?
'टाईमपास' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा किस्सा सांगताना केतकी म्हणाली, "मला वेड लागले प्रेमाचे' मध्ये छत्री फिरवतं मी गाणं गाते असा एक आयकॉनिक सीन आहे. त्यावेळी एक माणूस चाकू घेऊन माझ्या पाठीमागे पळत येत होता. तो एक माथेफिरु होता. तेव्हा पटकन रवी सर आले आणि त्यांनी सगळं सांभाळून घेतलं. पण, मी मात्र गाणं शूट करण्यात व्यस्त होते. परंतु त्या माणसाने असं का केलं? मला माहित नाही." असा खुलासा अभिनेत्रीने केला.