Hemal Ingle Video: प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझचे (Diljit Dosanjh) कॉन्सर्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. दिलजीत भारतात वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या 'दिल-ल्यूमिनाटी टूर २०२४' च्या माध्यमातून कॉन्सर्ट करत आहे. दिलजीतच्या अमेरिका आणि युरोपमधील कॉन्सर्ट हिट ठरले. त्याच्या गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. दरम्यान, दिलजीतचा मुंबईतील एका कॉन्सर्टमधील व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या कॉन्सर्टला मराठमोळी अभिनेत्री हेमल इंगळेने हजेरी लावली. त्याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हेमल इंगळे आपल्या मित्रमंडळीसोबत दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये धमाल करताना दिसते आहे. व्हिडीओमध्ये बॅकग्राउंडला दिलजीतचं "तेरी नी मैं लवर..." गाणं वाजतंय आणि हेमल त्या गाण्यावर डान्स करते आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट अभिनेत्रीने कॅप्शन लिहिलंय की, "दिलजीत दोसांझजी तुस्सी तो पूरे मुंबई दी दिल-ल्यूमिनेट कर दिता सी..." तिच्या या व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊलच पाडला आहे.
दरम्यान, अभिनेत्री हेमल इंगळे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. हेमलच्या घरी आता लगीनघाईला सुरुवात झाली आहे. अभिनेत्रीचं केळवण नुकतंच पार पडलं. याची खास झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली होती.
वर्कफ्रंट
मुळची कोल्हापूरची असलेल्या हेमल इंगळेने 'आस'मधून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. अभिनय बेर्डेसोबत 'अशी ही आशिकी' या चित्रपटात ती झळकली होती. या चित्रपटामुळे ती घराघरात लोकप्रिय झाली. अलिकडेच ती 'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटात झळकली होती.