Samir Choughule: गेल्या महिन्याभरात बॉक्स ऑफिसवर अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. वेगवेगळ्या विषयांवर आधारित असलेल्या या चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. यापैकी एक म्हणजे १ मे च्या दिवशी प्रदर्शित झालेला 'गुलकंद' हा सिनेमा. सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात महाराष्ट्राची हास्यजत्रामधील विनोदवीरांची फौज पाहायला मिळत आहे. सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात हे कलाकार या सिनेमात आहेत. दरम्यान, या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेते समीर चौघुले (Samir Choughule) यांनी त्यांच्या एका चाहत्याचा किस्सा शेअर केला आहे.
नुकतीच 'गुलकंद' सिनेमाच्या संपूर्ण टीमने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. त्यादरम्यान, आपल्या आयुष्यातील एका अविस्मरणीय प्रसंगाविषयी सांगताना समीर चौघुले म्हणाले, "मी मध्ये कोल्हापूरला गेलो होतो. तिथे माझ्या एका चाहत्याने २४ कॅरेटच्या सोन्यात माझं चित्र काढलं होतं. अतिशय मोठं असं ते पोस्टर आहे जे मी घरी ठेवलंय. एवढं सोन्याने मढलेलं माझं पोस्टर मी लावावं अशी घरी भिंतच नाहीये. त्यामुळे ते बाजूला ठेवून दिलं आहे. पण असे अनेक चाहते आहेत जे मला भेटत असतात. त्यांना मला गिफ्ट द्यायचं असतं. काही लोक अशीही असतात ज्यांचे आप्तेष्ट आजारी असतात. तर मी त्यांच्याशी बोलावं म्हणजे त्यांना बरं वाटेल म्हणूनच लोक मला फोन करतात. मी शक्य होईल तेव्हा बोलतो."
त्यानंतर पुढे ते म्हणाले, "आपल्यामुळे जर कोणाला आजाराशी लढण्याचं बळ मिळणार असेल तर आपण ते केलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे असे अनेक चाहते आहेत. फक्त माझेच नाही तर आम्हा हास्यजत्रेच्या सर्व कलाकारांना असे अनुभव येतात. चाहते आम्हा सगळ्यांवर खूप प्रेम करतात. गेल्या महिनाभर आम्ही प्रमोशनसाठी फिरतोय तेव्हा लोकांचं प्रेम मी पाहिलं. आपल्यामुळे कोणालातरी एवढा आनंद होतोय हा विचारच किती समाधान देऊन जातो." असं म्हणत समीर चौघुलेंनी त्याच्या चाहत्यांचे किस्से शेअर केले.