मराठी चित्रपटसृष्टीत होत असलेल्या वैविध्यपूर्ण व कल्पक प्रयोगांना मराठी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. मायबाप प्रेक्षकांनी असाच प्रतिसाद नवीन चित्रपटांनाही द्यावा, यासाठी नेहमीच वेगवेगळ्या क्लृप्त्या अवलंबल्या जातात. मुंबईत विलेपार्ले आणि अंधेरी येथे तसेच पुणे येथील गुडलक हॉटेलजवळ, डेक्कन जिमखाना येथे अभिनेत्री व दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे, सुव्रत जोशी, सायली संजीव या कलाकारांनी हातात फलक घेऊन रस्त्यावर उतरत जेव्हा रसिकांना चित्रपटगृहाकडे यायचे आवाहन केले, तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यांच्या हातात अत्यंत कल्पक व लक्ष वेधून घेणारे फलक होते. ‘आमच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आम्ही तुमच्याकडे आलोय, तुम्ही थिएटरमध्ये तरी या...’, ‘आमचा सिनेमा तुम्ही आई-बाबा, मित्र-मैत्रिणी, प्रियकर-प्रेयसी ते अगदी तुमच्या ‘एक्स’सोबतही पाहू शकता’, ‘मराठी लोकांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहिलाच नाही तर मराठी सिनेमा चालणार कसा?’, असे फलक घेऊन हे कलाकार हमरस्त्यात उभे होते.
लोकही त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत होते आणि चित्रपटासाठी येण्याचे आश्वासनही या कलाकारांना देत होते. मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित आणि सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मन फकिरा’ येत्या ६ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.