Swarada Thigale : स्टार प्रवाहवाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Gosht) ही मालिका लोकप्रिय असलेल्या मालिकांपैकी एक आहे. कौंटुबीक ड्रामा असलेली ही मालिका अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan), राज हंचनाळे तसेच शुभांगी गोखले, अपूर्वा नेमळेकर आणि संजीवनी जाधव यांसारख्या तगड्या कलाकारांजी फौज आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधानने मालिकेत मुक्ता नावाचं पात्र उत्तमरित्या साकारलं आहे. मालिकेतील मुक्ता-सागरची केमिस्ट्री आणि संपूर्ण कोळी कुटुंबाने प्रेक्षकांना आपलसं केलं आहे. दरम्यान, सध्या मनोरंजनविश्वात अभिनेत्री तेजश्री प्रधान मालिकेतून एक्झिट घेण्याच्या चर्चा सुरु आहेत. तिच्याजागी अभिनेत्री स्वरदा ठिगळे मुक्ताची भूमिका साकारण्यास असल्याची माहिती होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. पण, तेजश्रीने मालिकाचा सोडण्याचा निर्णय का घेतला? याच कारण अद्याप समोर आलेलं नाही.
सोशल मीडियावर स्वरदा ठिगळने एक खास फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे अभिनेत्रीने 'प्रेमाची गोष्ट' मालिकेचं शूटिंगला तिने सुरुवात केल्याची हिंट दिली आहे. स्वरदाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिच्या हातात मालिकेचं स्क्रिप्ट पाहायला मिळतंय.या स्क्रिप्टमध्ये इंद्रा कोळी म्हणजेच मुक्ताची सासू आणि दिर लकी यांचे डायलॉग्ज लिहिलेले दिसत आहेत. "नवं वर्ष आणि नवीन सुरुवात", असं कॅप्शन देत तिने हा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे चाहत्याचं लक्ष तिने वेधून घेतलं आहे. त्यामुळे आता स्वरदा ठिगळे मुक्ताच्या भूमिका साकारण्यास सज्ज झाल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. मराठीसह हिंदी मालिकाविश्व गाजवलेली स्वरदा ठिगळे आता मुक्ताच्या भूमिकेत झळकणार आहे.
स्वरदाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्रीने २०१३ मध्ये आलेल्या 'माझे मन तुझे झाले' या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर तिने 'प्यार के पापड', 'सावित्री देवी' या हिंदी मालिकांमधूनही काम केलं आहे. अखेरची स्वरदा स्वराज्य 'सौदामिनी ताराराणी' या मालिकेत झळकली. त्यानंतर आता अभिनेत्री 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून दमदार कमबॅक करते आहे.