Join us

"गाईचा वास येताच वळूने कुंपणाबाहेर उडी मारली अन्..."; अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा

By देवेंद्र जाधव | Updated: March 7, 2025 18:11 IST

वळू सिनेमातील लोकप्रिय कलाकार श्रीकांत यादव यांनी सर्वांना हा खास किस्सा सांगितला आहे (shrikant yadav, valu)

२००८ साली आलेला 'वळू' (valu marathi movie) सिनेमा आज मराठीमधील एक कल्ट क्लासिक सिनेमा म्हणून ओळखला जातो. गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष, ज्योती सुभाष, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, सतीश तारे, नंदू माधव, श्रीकांत यादव या कलाकारांनी सिनेमात प्रमुख भूमिका साकारली आहे. उमेश कुलकर्णीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. 'वळू' सिनेमात भूमिका साकारणारे अभिनेते श्रीकांत यादव यांनी सिनेमाविषयीचा खास किस्सा सर्वांसोबत शेअर केला.श्रीकांत यादव यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा किस्साआरपार या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत श्रीकांत यादव म्हणाले की, "वळू सिनेमा करताना आम्हाला प्राणी सापडत नव्हता. ११ जानेवारी २००७ ला शूटिंग सुरु होणार होतं. शेवटी प्राणी दाखवणारी जी माणसं असतात त्याने "ये लास्ट फोटो है" असं म्हणत उमेशला फोटो दाखवला. उमेशने फोटो बघितला. कारण त्याला तसाच प्राणी हवा होता. तर त्या वळूला सेटवर आणण्यात आलं. मुहुर्ताचा शॉट होता. पिंपळे पोमण नावाचं गाव होतं. त्या ठिकाणी गिरीश वगैरे सर्व आले होते. मी त्यांना नाश्ता आणि जेवणाचं सामान एकत्र करुन मागून जाणार होतो.""सेटवर ५०० मीटरच्या परिघात गाय असेल तर गाईचा वास वळूला लागला तर तो थांबत नाही. त्यामुळे गाईच्या वासाने वळूने उडी मारली. तो उडी मारून कुंपणाच्या पलीकडे गेला. गिरीशचा मला "कुठेयस, पत्रकार निघून चाललेत", असा फोन आला. मी त्याला म्हटलं "येतोय येतोय". त्यानंतर वळूचे जे ट्रेनर होते त्यांनी त्याला चुचकारत शांत केलं. मग मी तिथे पोहोचलो. स्क्रीप्टमध्ये सीन होता की,  वळू शांतपणे दहा-बारा गायींच्या मध्ये रवंथ करत बसलेला आहे. मी म्हटलं हा सीन होऊच शकत नाही. कॅन्सल करा." अशाप्रकारे श्रीकांत यांनी थरारक तरीही गंमतीशीर खुलासा केलाय.

टॅग्स :अतुल कुलकर्णीमराठी चित्रपट