Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनंत-राधिकाच्या लग्नाचं 'चारचौघी' नाटकाच्या टीमला आमंत्रण, अभिनेत्याने केलं कौतुक, म्हणाला- "अंबानी मॅनेजमेंटकडून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 14:29 IST

अनंत-राधिकाच्या लग्नाचं अनेक सेलिब्रिटींना आमंत्रण देण्यात आलं आहे. 'चारचौघी' नाटकाच्या टीमलाही अनंत-राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण मिळालं आहे. 

Anant Ambani-Radhika Merchant Wedding : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या जिकडेतिकडे अनंत आणि राधिकाच्या वेडिंग सोहळ्याची चर्चा आहे. त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. संगीत सोहळ्यानंतर अनंत आणि राधिकाचा हळदी समारंभ पार पडला. अनंत-राधिकाच्या लग्नाचं अनेक सेलिब्रिटींना आमंत्रण देण्यात आलं आहे. एका मराठी अभिनेत्यालाही अनंत-राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण मिळालं आहे. 

मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम करून अभिनेता श्रेयस राजे याने प्रेक्षकांची मनं जिंकली. तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. श्रेयसला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचं आमंत्रण मिळालं आहे. अंबानींकडून एक व्यक्ती हे आमंत्रण घेऊन श्रेयसच्या घरी पोहोचला होता. इन्स्टावरुन अनंत-राधिकाच्या वेडिंग कार्डचा फोटो श्रेयसने शेअर केला आहे. "आता जावं लागेल लग्नाला", असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. 

श्रेयसने पोस्टमध्ये अंबानींच्या मॅनेजमेंट टीमचंही कौतुक केलं आहे. "तर, ही दस्तूरखुद्द मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका आहे. ही पत्रिका माझ्यापर्यंत पोहोचावी म्हणून अंबानी मॅनेजमेंटकडून एक अख्खा माणूस अपॉईंट केला होता. जो वांद्रेहून घोडबंदरपर्यंत फक्त ही पत्रिका द्यायला आला", असंही त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. केवळ श्रेयसलाच नव्हे तर 'चारचौघी' नाटकाच्या संपूर्ण टीमला अंबानींच्या वेडिंग सोहळ्याचं आमंत्रण मिळालं आहे. अनंत अंबानी आणि राधिका येत्या १२ जुलैला लग्नगाठ बांधणार आहेत. मुंबईतील जिओ सेंटरवर त्यांचा हा ग्रँड विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यानंतर १४ जुलैला रिसेप्शनही असणार आहे. 

दरम्यान, श्रेयसने 'लग्नाची बेडी', 'ती परत आलीये', 'फुलाला सुगंध मातीचा', 'जिगरबाज', 'भेटी लागी जीवा' या मालिकांमध्ये काम केलं आहे. मराठी मालिकांबरोबरच वेब सीरिजमध्येही तो झळकला आहे. सध्या 'चारचौघी' या नाटकातून तो प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. 

टॅग्स :अनंत अंबानीमुकेश अंबानीसेलिब्रेटी वेडिंगमराठी अभिनेता