Join us
Daily Top 2Weekly Top 5

"अर्धा सिनेमा बाईचं कॅरेक्टर...", संजय खापरेंनी सांगितली 'गाढवाचं लग्न'ची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 12:41 IST

संजय खापरेंनी 'गाढवाचं लग्न' सिनेमात स्त्री पात्र साकारलं होतं. याबद्दल ते म्हणाले...

अभिनेते संजय खापरे (Sanjay Khapre) अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत काम करत आहेत. मराठी नाटक, मालिका आणि सिनेमे अशा सर्व क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. सध्या ते 'लय लय आवडतेस तू मला' मालिकेत दिसत आहेत. संजय खापरेंची 'गाढवाचं लग्न' सिनेमातली भूमिकाही खूप गाजली होती. त्यात त्यांनी स्त्री पात्र साकारलं होतं. नुकतंच एका मुलाखतीत त्यांनी या भूमिकेबद्दलच्या आठवणी ताज्या केल्या.

'गोळाबेरीज'युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत संजय खापरे म्हणाले, "करिअरच्या सुरुवातीला आपल्याकडे चॉइस नसतो. मला अशाच डॅशिंग भूमिका पाहिजे, चॉकलेट हिरोचीच भूमिका हवी असं कलाकार म्हणून प्रत्येकाला वाटत असतं. पण आपल्याकडे बघण्याचा दिग्दर्शकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. मला जेव्हा दिग्दर्शक राजू फुलकर सरांनी सांगितलं की अर्धा सिनेमा बाईचं कॅरेक्टर करायचं आहे तेव्हा माझा चेहरा पडण्यापेक्षा मला ते आव्हान वाटलं. काहीतरी नवीन करायची ती संधी होती आणि कामाचीही गरज होती. त्यामुळे जे पुढ्यात येईल ते काम वाजवणं, उत्तम करणं हे आपल्या हातात असतं. ते करण्यासाठी मी पहिल्यापासून प्रयत्न केले. त्यातच एक गाढवाचं लग्न. तेव्हा चॉइस नव्हता आणि काम हवं होतं म्हणून मी ते केलं."

"सरांना मी त्यावेळी विचारलं होतं की या भूमिकेसाठी मलाच का घेतलं? तर त्यांना वाटत होती की मी बाई म्हणून बरा दिसेल. ते दिसणंही महत्वाचं आहे. काही काही वेळा कॉमेडी वाटणं ठीक आहे पण फारच विचित्र दिसतंय हे अशी निदान माझ्या बाबतीत तरी कोणाची रिअॅक्शन यायला नको ही मला काळजी होती. मी साडीत कसा दिसेल याची मीच कल्पना केली नव्हती. पण राजू सरांना मी त्यात चांगला वाटलो. ते माझ्यासाठी आव्हानच होतं. मला मंगल मावशी साडी नेसवायच्या. त्यांनी जयश्री गडकर, रंजना, पद्मा चव्हाण या दिग्गज अभिनेत्रींना साड्या नेसवल्या आहेत. त्या आपल्याला साडी नेसवतात हे माझ्यासाठी खूप अप्रूप होतं. रेडिमेड नाही तर पद्धतशीर त्यांनी मला नऊवारी नेसवली होती."

"ती भूमिका करताना हेच डोक्यात होतं की भले आपल्याकडून कॉमेडी फार झाली नाही तरी चालेल पण त्या स्त्रीच्या भूमिकेचा सम्मान राखला गेला पाहिजे. कारण तो लोकनाट्यावरुन घेतलेला सिनेमा होता. त्यात द्वयार्थी गोष्टी येऊ शकणाऱ्या होत्या. त्यामुळे तो समतोल राखणं गरजेचं होतं. सिनेमा पाहायला घरची मंडळी येतात. तर मला माझअया घरच्यांसमोर करताना किंवा त्यांना ते पाहताना असहज वाटू नये हा माझा प्रयत्न होता. त्या साडीची आपण लाज राखली पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मकरंदनेही मला तो समतोल राखण्याचा सल्ला दिला होता. दिग्दर्शकासोबतही मी खूप चर्चा केली. त्यांनी मला खरोखरंच उत्तम सिनेमा दिला. ती भूमिका करताना मजाही आली. सिनेमा बॉक्सऑफिसवर हिट झाला नाही पण आज टीव्हीवर त्याची पारायणं होतात."

टॅग्स :मराठी अभिनेतामराठी चित्रपट