Join us
Daily Top 2Weekly Top 5

'काहो इथेच येऊन का बसलात?'; पहिल्याच भेटीत रमेश देव यांच्यावर बरसल्या होत्या सासूबाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 15:10 IST

Ramesh deo: रेल्वेत झाली होती रमेश अन् सीमा देव यांची भेट; पहिल्याच भेटीत अभिनेत्यावर बरसल्या होत्या सासूबाई

दमदार अभिनयकौशल्य, लोभसवाणा चेहरा यांच्या जोरावर मराठी कलाविश्वाचा एक काळ गाजवणारी ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे सीमा देव. काल प्रदीर्घ आजारामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.विशेष म्हणजे रमेश देव यांच्या निधनाच्या पावणे दोन वर्षांमध्येच सीमा देव यांचं निधन झालं. त्यामुळे सध्या सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. सीमा देव आणि रमेश देव या जोडीकडे एव्हरग्रीन कपल म्हणून पाहिलं जात होतं. त्यामुळे हे दोन्ही दिग्गज कलाकार सोडून गेल्यामुळे मराठी कलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यामध्येच सध्या या जोडीच्या पहिल्या भेटीला किस्सा चर्चिला जात आहे. 

रमेश देव यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांच्या आणि सीमा देव यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला होता. विशेष म्हणजे या पहिल्याच भेटीत सीमा देव यांची आई रमेश देव यांच्या अंगावर ओरडली होती.

"आमची पहिली भेट थर्ड क्लासच्या डब्यात झाली होती. ही गोष्ट साधारणपणे ६० च्या सालामधली आहे. मी त्यावेळी हिरो होतो, व्हिलनही होतो. पण, त्यावेळी मराठीमध्ये जास्त पैसे मिळत नव्हते. त्यामुळे फर्स्ट क्लासमध्ये जायची माझी ताकद नव्हती. म्हणून मी ग्रँड रोडवरती थर्ड क्लासच्या डब्यात शिरलो.  त्यावेळी गाडीत फारशी गर्दी नसायची. मी डब्यात चढल्या बरोबर मोगऱ्याच्या फुलांचा सुंदर वास सगळीकडे पसरला. मला मोगरा प्रचंड आवडतो. त्यामुळे मी हा वास कुठून येतोय हे पाहण्यासाठी डब्यात नजर फिरवली. तर, एका बाकावरती एक वयस्कबाई आणि एक सावळी मुलगी बसली होती. त्यांनी डोळ्यावर मोठ्या गजऱ्याच्या माळा सोडल्या होत्या", असं रमेश देव म्हणाले.

पुढे ते म्हणतात,  "त्या वासावर भुलून मी त्यांच्या समोर जाऊन बसलो त्यावेळी व्हिलन म्हणून मला खूप प्रसिद्धी मिळाली होती. पण, या दोघींच्या समोर मी जाऊन बसताच ती म्हातारी बाई खसकन माझ्यावर ओरडली आणि म्हणाली ‘ ए ह्याच्याकडे जास्त बघू नको हा व्हिलन आहे’.  त्या दोघी म्हणजे सीमा आणि तिची आई होती. त्या मला व्हिलन म्हटल्यावर मला जाम राग आला होता. त्या बाई मला म्हणाल्या की ‘काहो इथेच येऊन का बसला, सबंध डबा रिकामा आहे ना’. मी म्हटलं ‘हो आहे ना , पण डबा काय तुमच्या बापाने विकत घेतलाय का? मी कुठेही बसेन, तुम्ही जर जास्त बोललात ना तर तुमच्या दोघींच्याही मध्ये येऊन बसेन. एकतर तुम्ही उठून जा आणि तुम्ही जिथे जाल तिथे मी येऊन बसेन.’ त्यानंतर सीमाने आपल्या आईला शांत बसण्यास सांगितले. ती माझ्याकडे चोरून बघत होती पण मी तिच्याकडे डायरेक्ट बघत होतो. आपल्याला कोणाचीही भीती नव्हती. तेव्हा ती म्हातारी डोळे मोठे करून माझ्याकडे बघू लागली त्यात तिने मोठ्या भिंगाचा चष्मा लावलेला त्यामुळे ते डोळे आणखीनच मोठे दिसू लागले. आता मी त्यांना म्हातारी म्हणतो खरं पण त्या माझ्या सासूबाई आहेत.  त्या प्रचंड प्रेमळ आहेत.माझ्या संसाराला पुष्कळसा हातभार त्यांनीच लावलेला आहे. थर्ड क्लासच्या डब्यामध्ये आमची दोघांची ही पहिली भेट झाली”.

टॅग्स :रमेश देवसेलिब्रिटीसिनेमामराठी अभिनेता