Join us  

'मै अटल हूँ' पाहून भारावला प्रसाद ओक, रवी जाधवला म्हणाला, 'आणखी एक नॅशनल अवॉर्ड...'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 2:44 PM

'पंकज त्रिपाठी व्यक्ती नाही तर...' प्रसाद ओकने केलं कौतुक

मराठी अभिनेता प्रसाद ओकची (Prasad Oak) सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आहे. प्रसादने नुकताच रिलीज झालेला 'मै अटल हूँ' (Main Atal Hoon) सिनेमा पाहिला. रवी जाधव दिग्दर्शित हा सिनेमा पाहून प्रसाद खूपच भारावला. त्याने रवी जाधवचं कौतुक करत आणखी एक नॅशनल अवॉर्ड पक्कं अशी प्रतिक्रिया दिली. तसंच मुख्य अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi)  यांच्याविषयी भरभरुन बोलला. प्रसादने सिनेमाच्या स्क्रीनिंगला पत्नीसह हजेरी लावली होती. याचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेत. 

प्रसादची सोशल मीडिया पोस्ट 

प्रसाद लिहितो,"रवी जाधवने आजपर्यंत अनेक उत्तमोत्तम चित्रपट केले पण माझ्या मते 'मैं अटल हूँ' हा रवीचा आजपर्यंतचा सर्वोत्तम चित्रपट आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, छायाचित्रण, पार्श्वसंगीत, अभिनय आणि दिग्दर्शन याची उत्तम भट्टी जमलेली आहे.

तो पुढे लिहितो, "पंकज त्रिपाठी  ही आता व्यक्ती न राहता त्यांचे विद्यापीठ  झाले आहे. माझ्या मते या विद्यापीठाचे विविध अभ्यासक्रम आपण पाहिले. पण पुन्हा एकदा मैं अटल हूँ हा अभ्यासक्रम सर्व अभिनेत्यांनी धडा घेण्यासारखा आहे. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर पंकज सरांनी अंगीकारलेली शरीर भाषा निव्वळ अप्रतिम. रवी… तुझं अजून एक NATIONAL AWARD पक्क झालं रे मित्रा…!

प्रसादची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंकज त्रिपाठींच्या 'मै अटल हूँ' सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळतोय. म्हणावी तशी गर्दी थिएटरमध्ये न जमल्याने बॉक्सऑफिसवर परिणाम दिसून येतोय. अर्थात या वीकेंडला सिनेमा किती कमाई करतो यावर त्याचं भविष्य अवलंबून आहे.

टॅग्स :प्रसाद ओक मराठी अभिनेतारवी जाधवपंकज त्रिपाठीअटलबिहारी वाजपेयीसिनेमा