Join us
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्या वयाच्या २० व्या वर्षांमध्ये..'; अक्षय म्हात्रेचा बाबांसाठी खास मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 16:00 IST

Akshay Mhatre: अक्षय सध्या पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत दोन मुलींच्या वडिलांची भूमिका साकारत आहे.

छोट्या पडद्यावर काही दिवसांपूर्वीच पुन्हा कर्तव्य आहे ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर गाजत असून त्यातील कलाकार प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय झाले आहेत. यामध्येच मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय म्हात्रे. या मालिकेत दोन मुलींच्या वडिलांची भूमिका साकारणाऱ्या अक्षयने त्याच्या वडिलांविषयी भाष्य केलं आहे.

"जगभरामध्ये १६ जून रोजी फादर्स डे साजरा केला जातो. त्यामुळे या दिवसाचं निमित्त साधत त्याने त्याच्या वडिलांच्या आठवणी शेअर केल्या आहेत. "पुन्हा कर्तव्य आहे' मध्ये मी दोन लहान मुलींच्या बाबाची भूमिका साकारत असल्यामुळे मला अनेक गोष्टी शिकायला मिळतायेत. सगळ्यात पहिले म्हणजे त्यांच्यासोबत काम करत असताना संयम शिकलो आणि मी हे खूप सकारात्मक दृष्टिकोनातून बोलत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नि:स्वार्थ प्रेम जे ओव्हर द इयर्स जसे आपण आयुष्यात पुढे जातो आपल्यामध्ये ते कमी होत जातं. आपण तोलून मापून आणि जपून बोलतो पण लहान मुलांमध्ये ते फिल्टर नसत. ते कुठल्याही स्वार्थाने वागत नाहीत बोलत नाहीत,  त्यांच्या सगळ्या भावना निर्मळ आहेत आणि ती गोष्ट शिकण्यासारखी आहे. महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर लहान मुलं गोष्टी लवकर आणि खूप सहजतेने शिकतात. मी चिनू-मनूचा ऑनस्क्रीन बाबा आहे, पण ऑफस्क्रीन त्याच्याशी  मस्ती करत असताना मी भान ठेवतो की मी काय बोलतोय आणि कसा वागतोय कारण ते आपल्याला बारकाईने पाहून शिकत असतात. त्या दोघींच्या सहवासात राहून एक ऊर्जा वाढते की आपण ही उत्तम माणूस व्हावं म्हणजे ते ही आपल्याकडून चांगल्या गोष्टी शिकतील", असं अक्षय म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "माझं आणि माझ्या बाबांचं नातं थोडं वेगळं आहे. लहानपणी बाबांसोबत तसं मैत्रीच नातं नव्हतं. माझे बाबा थोडे कडक शिस्तीचे होते म्हणून लहानपणी आमच्या गप्पा आणि बोलणं तसं नव्हतं आणि मी ही थोडा शांत होतो. आमचं नातं माझ्या वयाच्या २० व्या वर्षांमध्ये खुलत गेलं आम्ही वेगवेगळ्या विषयवर बोलू लागलो मग ते सिनेमा, राजकरण किंवा रोजच्या आयुष्याच्या घडामोडी असो. आता अशीवेळ आली आहे की मी माझ्या आईपेक्षा बाबांशी तासंतास बोलतो. बाबांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. ते न बोलता खूप काही करुन जातात, त्यांच गोष्टींकडे बारीक लक्ष असतं कोणाला काही मदत लागणार असेल किंवा घरात कशाची गरज असेल ते बरोबर लक्ष देऊन ती गरज पूर्ण करतात. कुटुंबाचा आधारस्तंभ आहेत माझे बाबा. ते माझं कौतुक असं बोलून करत नाही पण मला माहिती आहे की त्यांनी बोलून जरी दाखवलं नाही, तरी त्यांना माझा अभिमान आहे. आणि, मी ही असंच उत्तम काम करून त्यांना अभिमान बाळगण्याची कारणे देत राहायचा प्रयत्न करत आहे. ते कधी ना कधी मला शाबाशकी नक्की देतील ह्याची मला खात्री आहे. बाबांना इतकंच बोलू इच्छितो 'आय लव्ह यु बाबा' आणि हैप्पी फादर्स डे!”

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारमराठी अभिनेता