ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23- लेखक सादत हसन मंटो यांचा जीवनप्रवास रूपेरी पडद्यावर उलगडला जाणार आहे. खरंतर अतिसंवेदनशील विषयावर लेखन करणं ही सादत हसन मंटो याची खासियत. मंटो यांची ही संपूर्ण कहाणी, त्यांचं जीवन या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं एक नवं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. सध्या सुरु असणाऱ्या ७० व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये या बहुचर्चित सिनेमाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं आहे. नंदिता दास यांनी मंटो सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे तर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी या सिनेमात मंटोची भूमिका साकारत आहे.
मंटो या सिनेमासाठी नवाजने बरीच मेहनत केली आहे. सिनेमाच्या या पोस्टरमध्ये विविध छटा बघायला मिळत आहेत. नवाजच्या केशरचनेपासून ते त्याच्या डोळ्यातील हावभाव अगदी सगळंच थक्क करणार आहे. त्याचबरोबर पोस्टरवर उर्दू कॅलिग्राफीही बघायला मिळते आहे. पोस्टरवर असलेला एक ओरखडा मंटोंच्या लेखनशैलीला असलेला विरोध सांगतो आहे.
नंदिता दास दिग्दर्शित मंटो या सिनेमात 1940 चा काळ रेखाटण्यात आला आहे. तसंच लेखक सादत मंटो नेमके कोण ? त्यांचं काम काय ? याबद्दलची संपूर्ण माहिती प्रेक्षकांना मिळणार आहे. सिनेमामध्ये अभिनेत्री रसिका दुग्गल नवाजसोबत स्क्रीन शेअर करणार असून, ती मंटो यांच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार आहे. एकदरितच नंदिता दास यांच्या मंटो या सिनेमाकडे त्याचबरोबर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या नव्या भूमिेकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.