अफलातून अभिनय आणि विनोदाची अचूक सांगड घालत प्रेक्षकांना खळखळवून हसवणारी नम्रता संभेराव ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांतून अभिनयाचा ठसा उमटवलेल्या नम्रताला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमुळे प्रसिद्धी मिळाली. या शोमधून नम्रता घराघरात पोहोचली. काही वेळ ब्रेक घेतल्यानंतर आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' निमित्ताने नम्रताने नुकतीच 'तारांगण' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने कामासाठी घरातल्यांचा पाठिंबा असल्याचं म्हणत सासूचं कौतुकही केलं. नम्रता म्हणाली, "माझ्या सासूशिवाय मी काहीच करू शकत नाही. सासू आयुष्यात आहे म्हणून माझं सगळं काम सुरळीत पार पडतंय. सगळं व्यवस्थित चालू आहे. आपण दोन पायांवर व्यवस्थित चालू शकतो. त्यामुळे मी म्हणेन की माझी सासू म्हणजे माझा दुसरा पाय आहे. माझा मुलगा रुद्राज पू्र्ण वेळ त्यांच्याबरोबर असतो. मला पूर्ण वेळ त्याला देता येत नाही. त्यामुळे माझी सासू त्याची यशोदा आहे".
दरम्यान, हास्यजत्रेतून घराघरात पोहोचलेल्या नम्रताचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. नम्रता सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नाच गं घुमा या सिनेमात नम्रता मुख्य भूमिकेत दिसली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचं कौतुकही झालं होतं. आता 'थेट तुमच्या घरातून' या नाटकातून नम्रता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.