Join us

सेटवरील जादूने नाटक सिनेमॅटिक

By admin | Updated: December 9, 2015 00:53 IST

मराठीमध्ये अशी एखादी कलाकृती व्हायला पाहिजे, जी केवळ मराठीचेच नव्हे, तर जगभरातील रंगभूमीचे लक्ष वेधून घेईल.

२२ जून २००४ ला पॅरिसमध्ये जागतिक दर्जाचा शो पाहिला, तो पाहिल्यानंतर थक्क झालो... आणि पटकन मनात विचार आला की, मराठीमध्ये अशी नाटकं कधी पाहायला मिळतील. मराठी रंगभूमीचा विचार केला, तर हे मान्यच आहे की, रंगभूमीवर नानाविध प्रयोग होत आहेत, विविधांगी विषय, सादरीकरण, मांडणी, कलाकारांचा अभिनय या वैशिष्ट्यांमुळे मराठी रंगभूमीने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे, पण आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात एकविसाव्या शतकाचे प्रतिनिधित्व मराठी रंगभूमी करणार असेल, तर त्या दृष्टिकोनातून वर्ल्ड क्लासची होणारी नाटकं मराठीमध्ये होणं हीदेखील आता काळाची गरज बनली आहे. मराठीमध्ये अशी एखादी कलाकृती व्हायला पाहिजे, जी केवळ मराठीचेच नव्हे, तर जगभरातील रंगभूमीचे लक्ष वेधून घेईल. हे वाटत असतानाच केदार शिंदे यांच्या सध्या रंगभूमीवर गाजत असलेल्या ‘तू तू मी मी’ या नाटकाने ही कसर काही अंशी भरून काढली आहे, हे पाहाताक्षणीच जाणवले. हे नाटक पाहिल्यानंतर एकप्रकारे भारावूनच गेलो. केदारचे उत्कृष्ट दिग्दर्शन, मांडणी, अभिनय याबरोबरच ‘नेपथ्य’ हे त्या नाटकाचे ठळक वैशिष्ट्य होते. रंगभूमी हे एक लाइव्ह माध्यम समजले जाते. त्यामुळे त्याचा कालावधी हा निश्चित असतो. दोन किंवा तीन अंकी नाटकाच्या स्पेसमध्ये तुम्हाला खूप काही मांडायचे असते. कारण कन्टेंटदेखील तितकाच महत्त्वाचा असतो. या परिस्थितीत एखादा वेगळा प्रयोग करणे, म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे असते, पण केदारने रंगभूमीवर तब्बल 9 वेळा सेट्स बदलण्याचा अभिनव प्रयोग केला आहे. केवळ इतकेच नव्हे, तर यातील एक कलाकार तब्बल १४ भूमिकांमध्ये प्रेक्षकांना दर्शन घडवितो. यापूर्वीच्या रंगभूमीचा काहीसा धांडोळा घेतला, तर ‘तो मी नव्हेच’ या नटवर्य कै. प्रभाकर पणशीकर यांच्या रंगभूमीवर अजरामर झालेल्या नाटकात सेट बदलणे आणि एकाच व्यक्तीने विविधांगी भूमिका साकारण्याचा प्रयोग झाला आहे, हे देखील नाकारता येणार नाही, पण केदारने नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेत, एक जागतिक दर्जाची कलाकृती मराठी प्रेक्षकांसाठी निर्माण केली आहे, हे विशेष म्हणता येईल. या अभिनव प्रयोगाविषयी केदारकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. केदार म्हणाला, ‘हे नाटक म्हणजे जुन्या रॅपरमध्ये नवीन गोष्ट घालून दिली आहे, फक्त ती जरा ‘सिनेमॅटिक’ पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘तू तू मी मी’ हे नाटक १९९९ मध्ये लिहिले गेले . विषय पाहिला तर तो तसा कालातीत आहे पण १६ वर्षांनी म्हणजे २०१५ मध्ये ते रंगभूमीवर आणायचे म्हणजे ते आजच्या युगाला अनुसरून असेच असले पाहिजे. यासाठी नाटकाच्या सेटचे डिझाइन त्या पद्धतीने करण्यात आले. मुळात कसे असते एखाद्या दिग्दर्शकाच्या डोक्यात खूप कल्पना असतात, पण त्या रंगभूमीवर प्रत्यक्षात साकार करता येणे शक्य आहे का नाही, याचे अचूक ज्ञान नेपथ्यकारालाच असते, या नाटकासाठी नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिल्यानंतरच त्यावर विचार सुरू झाला. मग ते सिनेमॅटिक पद्धतीने लिहिले गेले. लोकेशन कशा पद्धतीने चेंज होत जातात, मग परिस्थितीला अनुसरून गाणी, भूमिकांमधील बदल हे सर्व पाहताना सिनेमा पाहात असल्याचा अनुभव प्रेक्षकांना नक्कीच येतो.’रंगभूमी हे प्रयोग करण्याचे साधन आहे. १४ वर्षांपूर्वी जेव्हा ‘सही रे सही’ केले, तेव्हा लोकांना हेच नाटक हवे होते, पण तेच तेच करीत असतो, तर इंडस्ट्रीमध्ये नक्कीच टिकलो नसतो. मग ‘आली लहर केला लहर’ हा कार्यक्रम केला. माझ्या स्टाईलची ‘कॉमेडी’ मांडायला मला आवडते. त्यामध्येदेखील वेगळेपणा शोधायचा मी प्रयत्न करतो. एखादी गोष्ट आपण करतो, ती मनापासून करता आली पाहिजे, तरच अर्थ आहे. त्या पद्धतीने मी काम करतो. मी काय करतो, त्याचा डांगोरा पिटायला मला मुळीच आवडत नाही. माझं मत आहे, की अभिव्यक्त होण्याची माध्यमं ही सातत्याने बदलत आहेत. त्याचा फायदा करून घेता आला पाहिजे. हे नाटक पाहिल्यानंतर प्रेक्षक ज्या भावना व्यक्त करतात, तीच माझ्या कामाची पावती आल्याचे मला वाटते.