Join us
Daily Top 2Weekly Top 5

मनोरंजनाची धमाल अन अक्षयची कमाल

By admin | Updated: October 3, 2015 02:00 IST

अक्षय कुमारने यापूर्वी सिंग इज किंग या चित्रपटातून शीख युवकाची भूमिका केलेली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.

अक्षय कुमारने यापूर्वी सिंग इज किंग या चित्रपटातून शीख युवकाची भूमिका केलेली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. आता पुन्हा एकदा प्रभूदेवा दिग्दर्शित ‘सिंग इज ब्लिंग’ या चित्रपटातून अक्षय कुमार शीख युवकाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आला आहे. मनोरंजनाचा भरपूर मसाला घेऊन आलेल्या या चित्रपटाची कथा सुरू होते ती पंजाबच्या एका गावापासून. रफ्तार सिंह (अक्षय कुमार) हा मौजमजेचे आयुष्य जगत असतो; पण काही काम करीत नसल्यामुळे त्याचे वडील त्याला गोव्याला पाठवितात. येथे रफ्तारच्या वडिलांच्या मित्राचे कॅसिनो आहे. रफ्तारला येथे काम मिळते. कॅसिनोच्या मालकाच्या मित्राची मुलगी सारा (एमी जॅक्सन) आपल्या आईच्या शोधात रोमानियाहून गोव्याला येते. रोमानियातील गँगस्टर (के. के. मेनन ) साराशी लग्न करण्यासाठी इच्छुक असतो आणि साराच्या शोधासाठी तो त्याच्या गँगच्या लोकांना गोव्यात पाठवितो. तर इकडे साराच्या सुरक्षेची जबाबदारी रफ्तारला दिली जाते.सुरक्षेच्या कारणास्तव रफ्तार हा साराला आपल्या गावी - पंजाबमध्ये घेऊन जातो. इथे रफ्तारच्या परिवाराला भेटल्यानंतर साराला नात्यातील हळुवार संबंध अनुभवायला मिळतात. दरम्यान, गोव्यात साराच्या आईचा शोध लागतो आणि सारा पुन्हा पंजाबहून गोव्यात येते. मात्र आईला भेटण्यापूर्वीच ती पुन्हा रोमानियाला जाते. एवढेच काय पण ती त्या गँगस्टरशी लग्न करण्यासही तयार होते. साराच्या आईला घेऊन रफ्तार रोमानियाला जातो आणि तो सारावर किती प्रेम करतो याची साराला जाणीव करून देतो.-----------------चित्रपट सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांना भरभरून हसवितो आणि चित्रपटाच्या पहिल्या भागातच पैसा वसूल होतो. मध्यंतरानंतर चित्रपट कॉमेडीवरून इमोशनच्या ट्रॅकवर येतो. परफॉर्मन्सबाबत बोलायचे झाल्यास अक्षयने एकूणच धमाल केली आहे. एमी जॅक्सन सौंदर्य आणि स्टंट सीनमध्येही परफेक्ट वाटते. चित्रपटाचे सरप्राइज म्हणाल तर लारा दत्त. सहायक भूमिकेत योगराज सिंह, के. के. मेनन, रती अग्निहोत्री यांच्यासह शशी कपूरचा मुलगा कुणाल कपूर आहे.