ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 11 - भारतीय नौसेनेतील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने फाशीची शिक्षा दिल्यानं गायक असलेल्या अभिजितला संताप अनावर झाला आहे. अभिजितने ट्विटरच्या माध्यमातून पाकला धमकीवजा इशारा दिला आहे. कुलभूषण यांच्या शिक्षेला स्थगिती न दिल्यास भारतात जिथे पाकिस्तानी लोक दिसतील तिथेच त्यांना झाडावरच लटकवा, असं अभिजितनं स्वतःच्या ट्विटर हँडलवरून म्हटलं आहे. एवढ्यावरच न थांबता अभिजितनं पाकिस्तानवर आगपाखड केली आहे. ट्विटमध्ये त्याने बॉलिवूडमधल्या काही कलाकारांनाही लक्ष्य केलं आहे. जर भारतात पाकिस्तानी शोधायचे म्हटल्यास जास्त पाकिस्तानी हे भट्ट किंवा जोहर यांच्याच घरी मिळतील, असंही तो म्हणाला आहे. ट्विटमधून त्यांनी बॉलिवूडमधल्या खानांनाही खडे बोल सुनावले आहेत. कुलभूषण यांना फाशी देण्याच्या निर्णयावर आता सगळे खान मूग गिळून का बसलेत? असा सवाल त्याने ट्विटवरून केला आहे. दरम्यान वर्षभरापूर्वी जम्मू-काश्मीरमधील उरी येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतामध्ये पाक कलाकारांना बंदी घालण्यात आली होती. त्यावेळीही त्यानं पाकिस्तानी कलाकारांना लक्ष्य केलं होतं. तसेच पाक कलाकारांना काम देणाऱ्या महेश भट्ट, करण जोहर आणि बॉलिवूडमधल्या खान कंपनीला त्याने दलाल म्हटले होते.
कोण आहेत कुलभूषण जाधव?पाकिस्तानने रॉ या गुप्तहेर संघटनेचा हस्तक म्हणून जेरबंद केलेल्या कुलभूषण यांनी नौदलातून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती. जाधव यांचा इराणी बंदरावरून माल पाकिस्तानात आणण्याचा व्यवसाय आहे. त्यांना पाकिस्तानने बलुचिस्तान येथून अटक केली आहे. मुंबईतील कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमध्ये एका महिन्यापूर्वीच अटक करण्यात आली असावी, असा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, कार्गो व्यवसायात असलेला कुलभूषण इराणला गेला होता. त्यांचा आणि भारताच्या रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंग (रॉ) या गुप्तचर यंत्रणेशी काडीमात्र संबंध नाही. त्यांनी नौदलातून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यांचे वडील हे माजी पोलीस सहायक आयुक्त आहेत. कुलभूषण यांनी तीन महिन्यांपूर्वी आपले वडील सुधीर जाधव यांच्याशी संपर्क साधला होता, तर पत्नीशी तो एका महिन्यापूर्वी बोलला होता. त्यानंतर ना त्याचा फोन वा मेल आला, ना त्याच्याशी घरच्यांचा संपर्क झाला. त्यामुळे एका महिन्याच्या काळातच त्याला पाकिस्तान सरकारने अटक केली असावी, असे घरच्यांना वाटत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कार्गो व्यवसायात असलेला कुलभूषण इराणमधील बंदर अब्बास आणि छाबहर बंदरांतून मालवाहतूक करीत असे. त्याच्याकडे इराणमध्ये जूनपर्यंत राहण्यासाठी अधिकृत परवाना होता. त्याचा स्वत:च्या व्यापाराखेरीज कशाशीही संबंध नव्हता, असे त्याच्या निकटवर्तीयांनीही सांगितले.