वैभव तत्त्ववादीने डिस्कव्हर महाराष्ट्र या कार्यक्रमातून छोट्या पडद्यावर एंट्री घेतली. मग तो अमरप्रेम व तुझं माझं जमेना या मालिकांमध्ये मुख्य नायकाच्या भूमिकेत दिसला. ‘फक्त लढ म्हणा’ या चित्रपटानंतर त्याचा ‘कॉफी आणि बरंच काही’ चित्रपट गाजला. बॉलीवूडमध्ये मानाने घेतलं जाणारं नाव म्हणजे संजय लीला भन्साली निर्मित आणि दिग्दर्शन करत असलेल्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातून त्याने हिंदी सिनेसृष्टीतही पदार्पण केलं आहे. यामध्ये तो बाजीराव पेशवे यांच्या थोरल्या भावाची म्हणजेच चिमाजी अप्पांची भूमिका साकारत आहे. त्याला मिळालेल्या या संधीचे तो सोने करेल याबाबत तिळमात्र शंकाच नाही. वैभव तत्त्ववादीने बाजीराव मस्तानीमध्ये आलेले अनुभव ‘सीएनएक्स’शी बोलताना शेअर केले.संजय लीला भन्सालींच्या चित्रपटात काम करण्याचा अनुभव कसा होता?- हिंदी चित्रपट म्हणजे तिथे मुळातच सगळं मोठ्या प्रमाणावर असतं आणि त्यात संजय सरांचा चित्रपट आणि ते पण ‘बाजीराव मस्तानी’सारखा मोठा विषय त्यामुळे त्यांच्याकडून आणि संपूर्ण टीमकडूनच खूप काही शिकायला मिळालं. त्यात सगळ्यांबरोबरच माझे खूप महत्त्वाचे शॉट्स होते. त्यामुळे दडपण असलं तरी काम करायला तितकीच मजा आली. त्यांच्या अभिनयातून शिकण्याचा अनुभव फारच मस्त होता. मराठी आणि हिंदी चित्रपटातील प्रोफेशनलिझमबाबत काय वाटतं?- हिंदी किंवा मराठीच नाही तर प्रत्येकच इंडस्ट्रीमध्ये प्रोफेशनलिझम असतंच. कारण ते महत्त्वाचंच असतं आणि केवळ चित्रपटातील मुख्य कलाकारच नाही तर संपूर्ण टीमनेच प्रोफेशनली काम करण्याची गरज असते तरच चित्रपट यशस्वी होऊ शकतो. मला असं वाटतं की दोन चित्रपटांमध्ये फरक असतो तो फक्त बजेटचा. त्यामुळे बॉलीवूडमध्ये प्रोफेशनलिझम जास्त आहे, असं म्हणणं चुकीचं आहे. ते सगळीकडेच आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग या बॉलीवूड कलाकारांसोबत काम करताना काय शिकायला मिळालं?- माझ्या मते प्रत्येकच व्यक्तीमध्ये काही ना काही शिकण्यासारखं असतं. प्रत्येकाचं काही तरी वेगळेपण असतं. रणवीर सिंग हा चित्रपटांमध्ये अभिनय करताना जितका उत्साही दिसतो तितकाच तो त्याच्या खऱ्या आयुष्यातही कायम एनर्जेटिक असतो आणि तो कामाच्या बाबतीत तितकाच सिन्सियरही आहे. त्याच्यामुळे इतरांनाही काम करायचा हुरूप येतो. तर दीपिकाला आपण आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलं आहे. त्या सगळ्याच उत्कृष्ट आहेत आणि मला वाटतं, की ती हे करू शकते ते प्रोफेशनलिझममुळे. त्यामुळे सगळ्यांसोबतच चांगला रॅपो झाला आणि कायम राहिला.
दीपिकाकडून व्यावसायिकता शिकलो - वैभव तत्त्ववादी
By admin | Updated: December 2, 2015 09:02 IST