Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरूखचा चित्रपट साकारताना सापडली ‘लालबागची राणी’

By admin | Updated: May 29, 2016 02:24 IST

एका विशेष मुलीवर आधारित ‘लालबागची राणी’ चित्रपटाची चर्चा आता सगळीकडे सुरू आहे. ही ‘लालाबागची राणी’ म्हणजे नेमकी कोण, याविषयीही सर्वांना उत्सुकता आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर

एका विशेष मुलीवर आधारित ‘लालबागची राणी’ चित्रपटाची चर्चा आता सगळीकडे सुरू आहे. ही ‘लालाबागची राणी’ म्हणजे नेमकी कोण, याविषयीही सर्वांना उत्सुकता आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा ‘लालबागची राणी’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. वीणा जामकरची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाची कथा उतेकर यांना त्यांच्या डोळ्यांसमोर घडलेल्या एका घटनेवरून सुचली. हिंदीतील सुपरस्टार शाहरुख खानच्या ‘डॉन २’चे चित्रीकरण लालबाग येथे सुरू होते. गणपतीच्या गाण्याच्या शूटिंगवेळी फार गर्दी होती. त्यादरम्यान उतेकर यांना एक दाम्पत्य अत्यंत बेचैन होत फिरताना दिसले. त्यांच्या हातात एका मुलीचा फोटो होता. त्यांची विचारपूस करण्यासाठी उतेकर तेथे गेले आणि त्यांच्या चिंतेत असण्याचे कारण विचारले. तेव्हा त्यांची ‘ती’ फोटोतील मुलगी गर्दीत हरवल्याचे त्यांनी सांगितले. उतेकर यांना याचे फार वाईट वाटले. एवढे सांगून ते दोघेही तिला शोधण्यासाठी पुढे निघून गेले. ते निघून गेले पण उतेकर यांच्या मनात ‘त्या’ मुलीचा विचार सतत येत होता. ती मुलगी तिच्या आई-वडिलांना भेटली असेल का? ती सुखरूप असेल ना? या विचारांनी ते अस्वस्थ झाले होते. त्यानंतर कित्येक महिन्यांनंतरही त्यांच्या मनातून हा विषय जात नव्हता. अशा या भावनिक विषयावर चित्रपट तयार करण्याचे त्यांनी ठरवले. जर का सामान्य मुलांच्या पालकांची ही अवस्था असेल तर गतिमंद असलेल्या मुलांचे आणि पालकांचे काय होईल? असा विचार करून केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर अशा विशेष मुलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्याचा त्यांनी विचार केला. त्यांच्या पालकांचेही आयुष्य किती विशेष असते, हे जगासमोर मांडण्याचे त्यांनी ठरवले. ही हृदयस्पर्शी कहाणी लक्ष्मण उतेकर यांनी मनोरंजक पद्धतीने मांडत एका सामाजिक विषयालाही स्पर्श केला आहे. आशा पद्धतीने शाहरुखचा चित्रपट साकारताना सापडली ‘लालबागची राणी.’