Join us
Daily Top 2Weekly Top 5

"निरोप घेतो आता...", 'चला हवा येऊ द्या' संपल्यानंतर कुशल बद्रिकेची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 10:09 IST

'चला हवा येऊ द्या'ने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर कुशल बद्रिके भावुक, शेअर केला व्हिडिओ

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय ठरलेल्या कार्यक्रमांपैकी एक म्हणजे 'चला हवा येऊ द्या'. "हसताय ना? हसायलाच पाहिजे" असं म्हणत निलेश साबळे या कार्यक्रमाची सुरुवात करायचा. या शोमधील प्रत्येक कलाकार त्यांच्या विनोदीबुद्धीने अचुक टायमिंग साधत प्रेक्षकांना खळखळवून हसवायचे. गेली कित्येक वर्ष हा शो प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे. तब्बल १० वर्ष प्रेक्षकांना हसवल्यानंतर आता 'चला हवा येऊ द्या' शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. 

'चला हवा येऊ द्या' या शोमुळे केवळ प्रेक्षकांचं मनोरंजनच झालं नाही तर यामुळे अनेक नवोदित कलाकारांनाही संधी मिळाली. कुशल बद्रिके देखील 'चला हवा येऊ द्या' शोमुळे प्रसिद्धीझोतात आला. या शोने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. आता शो संपल्यानंतर कुशल भावुक झाला आहे. त्याने इन्स्टाग्रामवरुन 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. "माय बाप प्रेक्षकहो, सगळ्यांचे मनापासून आभार. चूक भूल द्यावी घ्यावी,” असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिलं आहे. 

कुशलच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. तर मराठी अभिनेता संतोष जुवेकरनेही या व्हिडिओवर कमेंट केली आहे. "तुम्ही परत येणार सगळे नवीन रूपात नवीन जोमात. पुराना जायेगा तभी तो नया आयेगा. Love u all आणि खूप खूप प्रेम तुम्ही सगळ्यांनी खूप हसवून हसवून आठवणी आणि खळखळते हसण्याचे क्षण आम्हाला दिले आहेत," असं त्याने कमेंटमध्ये म्हटलं आहे. 

'चला हवा येऊ द्या' मध्ये मराठी सेलिब्रिटींपासून ते अगदी बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. या लोकप्रिय शोने निरोप घेतल्याने प्रेक्षक नाराज आहेत. रविवारी(१७ मार्च) 'चला हवा येऊ द्या' शोचा शेवटचा भाग प्रसारित झाला. 

टॅग्स :चला हवा येऊ द्याकुशल बद्रिकेमराठी अभिनेता