Join us
Daily Top 2Weekly Top 5

...अन् भर मांडवात कश्मीरा पडली गोविंदाच्या पाया, अभिनेत्याने नातवांना मारली मिठी; भावुक करणारा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 09:02 IST

मतभेद विसरून गोविंदाने भाचीच्या लग्नाला हजेरी लावली होती. कश्मीराने आरतीच्या लग्नाला हजेरी लावलेल्या गोविंदाच्या पाया पडत त्याचे आशीर्वाद घेतले.

अभिनेता गोविंदाची भाची आणि प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आणि अभिनेत्री आरती सिंह नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. आरतीने दीपक चौहानशी लग्न करत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. मोठ्या थाटामाटात आरतीचा विवाहसोहळा संपन्न झाला. कौटुंबिक वादांमुळे आरतीच्या लग्नात गोविंदा येणार की नाही? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. पण, मतभेद विसरून गोविंदाने भाचीच्या लग्नाला हजेरी लावली.

आरतीच्या लग्नात मामा गोविंदा यांनी हजेरी लावली तर मी त्यांच्या पाया पडेन, असं कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीरा शाह म्हणाली होती. कश्मीराने आरतीच्या लग्नाला हजेरी लावलेल्या गोविंदाच्या पाया पडत त्याचे आशीर्वाद घेतले. याचा व्हिडिओ समोर आला आहे. कश्मीराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आरतीच्या लग्नातील काही खास क्षणांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत भर मंडपात कश्मीरा गोविंदाच्या पाया पडताना दिसत आहे. तर अभिनेत्रीने पाया पडताच गोविंदाही तिला आशीर्वाद देतो. कृष्णा आणि कश्मीराच्या दोन्ही मुलांनाही गोविंदा जवळ घेत त्यांना मिठी मारत असल्याचं दिसत आहे. आरतीच्या लग्नातले हे भावुक करणारे क्षण कश्मीराने शेअर केले आहेत.

नणंदेच्या लग्नासाठी भावजय कश्मीराने खास लूक केला होता. कश्मीराने पांढऱ्या रंगाची साडी नेसून खड्यांची ज्वेलरी घातली होती. आरती सिंह आणि दीपक चौहान यांनी कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत २५ एप्रिलला लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला कपिल शर्मा, अर्चना सिंह, पारस छाबड़ा, माहिरा शर्मा, तुषार कपूर, प्रियांका चहर चौधरी, अंकिता गुप्ता, शेफाली जरीवाला, देवोलिना भट्टाचार्जी या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 

टॅग्स :गोविंदाकृष्णा अभिषेकसेलिब्रेटी वेडिंग