Join us
Daily Top 2Weekly Top 5

पडद्यावर विराट कोहली साकारायला आवडेल!-आयुषमान खुराणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 18:39 IST

वेगळया धाटणीच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला आयुषमान स्वत: गायकही आहे. गाण्यांसोबतच त्याचे चित्रपट एका मागोमाग एक हिट होत आहेत. मोठया पडद्यावर गायक किशोर कुमार आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्या भूमिका साकारायचे अशी इच्छा आयुषमान खुराणाने मुलाखतीदरम्यान व्यक्त केली. 

श्वेता पांडेय

हॉट अ‍ॅण्ड हॅण्डसम अभिनेता आयुषमान खुराणा हा ‘बधाई हो’ आणि ‘अंधाधून’ या दोन चित्रपटांमुळे चर्चेत आहे. वेगळया धाटणीच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला आयुषमान स्वत: गायकही आहे. गाण्यांसोबतच त्याचे चित्रपट एका मागोमाग एक हिट होत आहेत. मोठया पडद्यावर गायक किशोर कुमार आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्या भूमिका साकारायचे अशी इच्छा आयुषमान खुराणाने मुलाखतीदरम्यान व्यक्त केली. 

* ‘बॅक टू बॅक’ हिट चित्रपटांच्या यादीत तुझे नाव सामील झाले आहे. कसं वाटतंय?- यश मिळालं की सगळयांनाच आनंद होतो तसाच मलाही होत आहे. मी कंटेंट आधारित चित्रपटांचा भाग बनू इच्छित होतो आणि व्यावसायिक पातळीवरही त्या चित्रपटाने नाव कमवावे असेही मला वाटते. या माझ्या दोन्हीही इच्छा पूर्ण होत आहेत. प्रेक्षकांना माझं काम आवडतंय याचा मला नक्कीच आनंद होतोय.

* तुला अमोल पालेकर आणि फारूख शेख यांच्या तोडीस तोड अभिनेता म्हणून तुझ्याकडे बघितले जात आहे. काय सांगशील?- ही खरंच आनंदाची बाब आहे. माझ्या एका मित्राने अलीकडेच मला सांगितले की, तू फारूख शेख नाही तर ‘शाहरूख शेख’ आहेस. शाहरूख खान आणि फारूख शेख यांच्यामधला. त्या ताकदीने अभिनय साकारणारा म्हणून तुझ्याकडे बघितले जातेय. मी असे मानतो की, मला मिळालेली ही सर्वांत बेस्ट कॉम्प्लिमेंट होती. खरंतर, मी जी माझी इमेज बनवू इच्छित होतो तीच बनत असल्याने मला आनंद वाटतोय.

* स्क्रिप्ट निवडण्यापूर्वी कुणाचा सल्ला घेतोस का?- नाही, आता नाही घेत. खरंतर, मला असं वाटतं की, मी जेव्हा लोकांचा सल्ला घेतो तेव्हा माझे चित्रपट बॉक्स आॅफिसवर कमाई करत नव्हते. जेव्हापासून मी लोकांचा सल्ला घेणं बंद के लं तेव्हापासून माझे चित्रपट चांगलीच कमाई करू लागले. परंतु, मी माझ्या पत्नीसोबत नक्कीच चर्चा करतो.

* वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी दिग्दर्शकांची पहिली पसंत तू असतोस. याप्रकारच्या इमेजबद्दल काय विचार करतोस?- वेगळया धाटणीपेक्षाही मी स्वत:ला कंटेंट आधारित चित्रपटांची पहिली पसंती म्हणून स्वत:ला ओळखतो.  ‘बरेली की बर्फी’,‘अंधाधून’ यांना वेगळया धाटणीच्या चित्रपटात आपण ठेऊ शकत नाही. तसाही आपल्याकडे बराच कंटेंंट आहे. आगामी काही चित्रपटातही तुम्हाला बराच कंटेंट बघायला मिळेल.

* कथानक आणि व्यक्तीरेखा यांच्यामध्ये कुणाला जास्त महत्त्व देतोस?- मी नेहमी कथानकालाच महत्त्व देतो. मी हे आमिर खान यांच्याकडून शिकलो आहे. त्यांनी ‘दंगल’च्या क्लायमॅक्समध्ये दोन्ही मुलींना स्वत:पेक्षा जास्त महत्त्व दिले होते. एका अभिनेत्यासाठी चांगल्या कथानकाचा भाग असणं खूप जरूरी असते. जेव्हा चित्रपट हिट होतो तेव्हा आपोआपच भूमिकेची चर्चा होते.

* बायोपिक्सविषयी तुझा काय विचार आहे?- मी किशोर कुमार यांच्यावर आधारित बायोपिक चित्रपटात काम करू इच्छितो. कारण त्यांच्याप्रमाणेच मी स्वत:साठी गाणे गाऊ शकतो. त्यांचे जेवढे काही किस्से ऐकले आहेत त्याच किस्स्यांसहित पडद्यावर त्यांचे आयुष्य जगण्याची इच्छा आहे. त्याशिवाय एका क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये देखील काम करू इच्छितो. विराट कोहली यांची बायोपिक अद्याप बाकी आहे. मला विराट बनायला नक्कीच आवडेल.                                                            

टॅग्स :आयुषमान खुराणाअंधाधुनबधाई हो