Join us

'या' कारणामुळे 13 वर्षीय लेकाला बॉलिवूडपासून दूर ठेवतो आमिर खान, किरण रावने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 11:53 IST

आयरा खानच्या संगीतमध्ये छोट्या आजादच्या गाण्याने सर्वांनाच प्रभावित केलं.

आमिर खानची (Aamir Khan) एक्स वाईफ किरण राव (Kiran Rao) सध्या आगामी 'लापता लेडीज' सिनेमामुळे चर्चेत आहे. आमिर खाननेही यामध्ये सहभाग घेतला आहे. दोघंही जोरदार सिनेमाचं प्रमोशन करत आहेत. ट्रेलर आणि पोस्टरला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे. किरण आणि आमिर यांचा आझाद हा 13 वर्षांचा मुलगा आहे. आयरा खानच्या संगीतमध्ये छोट्या आजादच्या गाण्याने सर्वांनाच प्रभावित केलं. दोघंही आजादला इंडस्ट्रीपासून दूर का ठेवतात याचा खुलासा किरण रावने नुकताच केला आहे.

आपल्या मुलाविषयी बोलताना किरण राव म्हणाली, "मला वाटतं मुलांना त्यांची प्रायव्हसी मिळाली पाहिजे. काही मुलांना फिल्म इंडस्ट्रीचं आकर्षण असतं. पण आजादला यामध्ये काहीच रस नाही. म्हणूनच आम्ही त्याच्यावरच सोडलं आहे. तसंही आमिर आणि मी खूपच इंट्रोव्हर्ट आहोत. आम्ही अजिबातच ग्लॅमरस नाही जे पार्टी करतील किंवा इव्हेंटमध्ये जातील. कदाचित म्हणूनच आजादनेही आपोआपच या बॉलिवूडच्या झगमगत्या दूनियेपासून दूर राहणंच पसंत केलं."

आजादच्या करिअरबद्दल किरण राव म्हणाली, "आजादला तर बॉलिवूडमध्ये रस नाही आणि माझीही अशी इच्छा नाही की त्याने अभिनय करावा. मला वाटतं मुलांनी त्यांचं आवडतं क्षेत्र स्वत:च शोधून काढावं."

काही वर्षांपूर्वीच किरण राव आणि आमिर खान यांनी घटस्फोट घेतला. मात्र ते आजही एकमेकांसोबत आहेत. सोबत कामही करत आहेत. किरण रावला सावत्र लेकीच्या लग्नसोहळ्यातही बघितलं गेलं. 2005 मध्ये किरण आणि आमिर खानने लग्न केलं होतं. तर 2021 मध्ये ते वेगळे झाले.

टॅग्स :आमिर खानकिरण रावबॉलिवूडपरिवार