आमीर खानचा भाचा एवढ्या ओळखीवर चित्रपट जगतात असलेला अभिनेता इम्रान खानच्या नावावर आणखी एक मोठे अपयश जमा झाले आहे. निखिल अडवाणीचे दिग्दर्शन व कंगना राणावत असलेल्या ‘कट्टी बट्टी’ला प्रेक्षकांनी पूर्णपणे नाकारले आहे. दोन हजारांपेक्षा जास्त प्रिंटवर प्रदर्शित झालेला व ३५ कोटींची गुंतवणूक असलेल्या या चित्रपटाची कथा जेवढी अनुत्साही आहे तेवढीच त्याची बॉक्स आॅफीसवरील सुरुवातही. गणपतीच्या आगमनाच्या सुटीचाही याला लाभ झाला नाही. चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई ही जवळपास ५ कोटी रुपये होती. नंतरच्या दोन दिवसांतही त्याच्या कमाईच्या आकड्यात काही भर पडली नाही. पहिल्या तीन दिवसांत ‘कट्टी बट्टी’ने १६ कोटी रुपयांच्या जवळपास कमार्ई केली. ही कमाई सरासरीपेक्षाही खालची समजली जाते. जाणकारांच्या म्हणण्यानुसार या चित्रपटामुळे वितरकांना खूप नुकसान सोसावे लागले. पहिल्या तीन दिवसांनंतर चित्रपट यावर्षीच्या फ्लॉप चित्रपटांच्या यादीत समाविष्ट झाला. ‘कट्टी बट्टी’सोबत प्रदर्शित झालेल्या ‘मेरठिया गँगस्टर’ची फरफ ट तर विचारू नये अशी होती. तीन दिवसांत त्याचा गल्ला एक कोटींपेक्षाही कमी झाल्याचे सांगण्यात येते. दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांचा अपवाद सोडता ‘मेरठिया गँगस्टर’चे खूपच हाल झाले.मागे प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबद्दल बोलायचे तर सलमान खानच्या प्रॉडक्शन कंपनीने बनविलेल्या ‘हीरो’चा रिमेक प्रेक्षकांना आवडला नाही. सूरज पांचोली व आथिया शेट्टी यांचे मोठ्या पडद्यावर प्रथमच आगमन करणाऱ्या ‘हीरो’ने प्रेक्षकांना निराश केले. कमाईतही तो ढिला पडला. पहिल्या वीकेंडला २० कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने दुसऱ्या वीकेंडपर्यंत म्हणजे १० दिवसांत ३० कोटींची कमाई केली. ५० कोटींपेक्षा जास्त खर्चाच्या या चित्रपटाने सलमान खानची कंपनी आणि ‘हीरो’ची मार्केटिंग करणारी इरोज कंपनीचे नुकसान होणे अटळ समजले जात आहे. २००७मध्ये प्रदर्शित झालेला अनिस बाज्मीचा ‘वेलकम’च्या दुसरा भाग ‘वेलकम बॅक’ची बॉक्स आॅफीसवरील सुरुवात जोरदार होती. हीरो आणि कट्टी बट्टीसारख्या ढिसाळ चित्रपटांचा थेट लाभ या विनोदी चित्रपटाला झाला. यामुळे तो कमाईत तिसऱ्या आठवड्यात १०० कोटी रुपयांच्या जवळपास गेला आहे. १०० कोटी कमाईच्या क्लबमध्ये दाखल व्हायला ‘वेलकम बॅक’ आता केवळ ४ कोटींपासून दूर आहे. पुढील आठवड्यात हे ४ कोटींचे लक्ष्य गाठले जाईल, असे समजले जाते. सैफ अली खानची मुख्य भूमिका असलेल्या व कबीर खानचे दिग्दर्शन असलेल्या ‘फँटम’ची कमाई ५३ कोटींपर्यंत गेली आहे.येत्या शुक्रवारी दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यात छोट्या पडद्यावरील कॉमेडी स्टार कलाकार कपिल शर्मा नायक असलेला पहिला चित्रपट ‘किस किस को प्यार करू’ व पाच नव्या मुलींना घेऊन दिग्दर्शक मधुर भांडारकरने केलेला ‘कॅलेंडर गर्ल्स’चा समावेश आहे. या दोन्ही चित्रपटांची आपापसात कोणतीही स्पर्धा नाही. एक कॉमेडी चित्रपट आहे व दुसरा चित्रपट मधुर भांडारकरच्या स्टाईलचा आहे. बॉक्स आॅफीसचा विचार करता या दोन्ही चित्रपटांत नवे चेहरे असल्यामुळे त्यांच्याकडून फार अपेक्षा बाळगणे धाडसी ठरेल.
‘कट्टी बट्टी’शी प्रेक्षकांनी घेतली कट्टी
By admin | Updated: September 22, 2015 00:14 IST