Join us  

हृतिक रोशनसोबत पुन्हा एकदा 'या' चित्रपटात झळकणार कतरिना कैफ

By admin | Published: March 22, 2017 10:46 AM

दिग्दर्शक कबीर खानच्या आगामी चित्रपटात कतरिना हृतिक रोशनसोबत दिसणार आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 22 - गेल्या ब-याच दिवसांपासून बॉलिवूडमध्ये एकही हिट चित्रपट न दिल्यानं काहीशी अडगळीत पडलेली कतरिना कैफ पुन्हा एकदा चित्रपटात झळकणार आहे. रणबीरपासून दुरावल्यानंतर व्यावसायिकदृष्ट्याही कतरिनाच्या पदरी अपयश आलंय. मात्र आता तिचं करिअर पुन्हा पूर्वपदावर येण्याची आशा आहे. दिग्दर्शक कबीर खानच्या आगामी चित्रपटात कतरिना हृतिक रोशनसोबत दिसणार आहे. या चित्रपटासाठी हृतिकला साइन करून बरेच दिवस उलटले असतानाच त्याच्यासोबत काम करण्यासाठी हिरोईन ठरत नव्हती. या चित्रपटासाठी दीपिका पदूकोण आणि कतरिना कैफ यांची नावे आघाडीवर होती. मात्र दीपिकावर मात करत कतरिनाला हा चित्रपट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कतरिना पुन्हा एकदा हृतिकसोबत मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटासाठी कृती सेननपासून दीपिका पदूकोणपर्यंत अनेक अभिनेत्रींची नावे चर्चेत होती. मात्र यात सध्या तरी कतरिनानं बाजी मारल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. विशेष म्हणजे स्वतः हृतिक रोशननेच कतरिनाच्या नावाचा आग्रह धरल्याची चित्रपटसृष्टीत चर्चा आहे. कबीर खान यांच्या याआधीच्या चित्रपटात कतरिनानं काम केले असल्याने तिला घेण्यात अडचण नव्हती. यापूर्वी हृतिकबरोबर कतरिनानं दोन चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत. हृतिक रोशन आणि कतरिनानं बँग-बँग आणि जिंदगी ना मिलेगी दोबारासारखे हिट चित्रपट दिले आहेत. तसेच 2012च्या हृतिकच्या अग्निपथ या चित्रपटात कतरिना चिकनी चमेली या गाण्यावर थिरकली होती आणि ते गाणंही सुपरहिट झालं होतं. कबीर खानच्या दिग्दर्शनातील अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालल्यानं आता हृतिक आणि कतरिनाचा आगामी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. कतरिनाला या चित्रपटामुळे पुन्हा एकदा लाइमलाइटमध्ये येण्याची संधी मिळणार आहे.