Join us

‘कासव’चे यश प्रेरणादायी!

By admin | Updated: April 14, 2017 04:09 IST

उत्तम आशयासाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी चित्रपटाने पुन्हा एकदा भारतीय सिनेसृष्टीवर निर्विवाद वर्चस्व मिळवत पाचव्यांदा सुवर्णकमळ पटकावले.

- Satish Dongare उत्तम आशयासाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी चित्रपटाने पुन्हा एकदा भारतीय सिनेसृष्टीवर निर्विवाद वर्चस्व मिळवत पाचव्यांदा सुवर्णकमळ पटकावले. ६४ व्या राष्ट्रीय पुरस्कारात ‘कासव’ या मराठी चित्रपटाला हा मान प्राप्त झाला असून, या चित्रपटाच्या सहायक दिग्दर्शकपदाची धुरा नाशिकच्या तुषार गुंजाळ याने सांभाळली आहे. पदार्पणाच्या पहिल्याच चित्रपटाला सर्वोच्च सन्मानाने गौरविल्याने तुषार भारावून गेला असून, ‘कासव’चे यश त्याला उभारी देणारे आहे. या चित्रपटा निमित्त तुषारबरोबर साधलेला संवाद...प्रश्न : तुझ्या पहिल्याच चित्रपटाला मिळालेल्या सर्वोच्च सन्मानाकडे तू कसा बघतोस?- ‘कासव’अगोदर मी काही लघुपटांवर काम केले आहे; परंतु ‘कासव’ हा माझा पहिलाच पूर्ण लांबीचा चित्रपट असून, त्याला मिळालेले यश माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. या चित्रपटाचा मी एक भाग असल्याचा आनंद होत असून, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी शिकण्यास मिळाल्या. ‘कासव’च्या यशाने आता पुन्हा काही तरी वेगळे करण्याचा हुरूप असून, त्यादृष्टीने माझी वाटचाल सुरू आहे. सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासारखे बरेच काही आहे. वेब सिरीजपासून डाक्युमेंट्रीची निर्मिती करण्याची एक मोठी संधी आहे. त्यादृष्टीने माझे काम सुरू आहे. प्रश्न : या चित्रपटात तू एक छोटीशी भूमिका केलेली आहे. याचा अर्थ भविष्यात प्रेक्षकांना तू अभिनय करताना दिसणार काय?- मी अगोदरच स्पष्ट करतो की, मला अभिनयाच्या तुलनेत लेखन आणि दिग्दर्शनात अधिक रस आहे. ‘कासव’मध्ये मी डॉ. मोहन आगाशे यांचा असिस्टंट म्हणून छोटीशी भूमिका साकारली आहे; मात्र याचा अर्थ मी अभिनयातच करिअर करणार असा होत नाही. वास्तविक जी गोष्ट मला भावते त्याविषयी मी नेहमीच सकारात्मक विचार करीत आलो आहे. अभिनयाबाबतदेखील असेच काहीसे आहे. त्यामुळे भविष्यात एखादी भूमिका आवडल्यास त्याला मी न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन; परंतु मला असे वाटते की, प्रेक्षकांनी ‘कासव’ बघून माझ्या कामाचे मूल्यमापन करायला हवे. प्रश्न : चित्रपटसृष्टीत येण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली?- अर्थातच आईवडील. वडील डॉ. बाळासाहेब गुंजाळ प्राध्यापक असल्याने त्यांच्याकडून मला समग्र असा वाचनाचा वारसा मिळाला. आईकडून चित्रकलेचे धडे मिळाले. वाचन आणि चित्रकला यातूनच मला कलेविषयीची आवड निर्माण होत गेली. पुढे मी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रात नशीब आजमावण्याचे ठरविले. पहिल्याच ‘कासव’ या चित्रपटात सहायक दिग्दर्शक म्हणून काम करीत असताना मला बऱ्याचशा गोष्टी शिकावयास मिळाल्या; मात्र अजून बराचसा पल्ला गाठायचा आहे. प्रश्न : नाशिकमधून बरेचसे कलाकार मराठी चित्रपटसृष्टीत यशस्वी होत आहेत, त्याविषयी काय सांगशील?- वास्तविक चित्रपट हे लोकशाहीचे माध्यम आहे. त्यामुळे अमूक एका शहरातून तुम्ही यायला हवे, असे म्हणणे चुकीचे आहे. अजूनही बऱ्याचशा लोकांचा समज आहे की, मुंबई, पुण्यातील कलाकारच इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध करू शकतात; मात्र ही धारणा पूर्णत: चुकीची असून, कुठल्याही शहरातील, तसेच खेड्यातील कलाकार आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर स्वत:ला सिद्ध करू शकतो. नाशिकमधील बरेचसे कलाकार सध्या इंडस्ट्रीत नशीब आजमावत असून, त्यांना मिळत असलेले यश सुखावणारे आहे. प्रश्न : तुझ्या आगामी प्रोजेक्टविषयी काय सांगशील?- सध्या मी एका वाहिनीसाठी क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करीत आहे. तसेच, ‘कासव’ या चित्रपटामुळे आमची एक टीम तयार झाली असून, त्यांच्यासोबत मी काही प्रोजेक्टवर काम करण्यास उत्सुक आहे. शिवाय, लेखनावरदेखील माझा भर असून, प्रेक्षकांना भावतील अशा कथांचे लेखन करण्याचा माझा मनोदय असेल.