Join us
Daily Top 2Weekly Top 5

लिओनार्डोच्या ऑस्करसाठी करीनाची प्रार्थना

By admin | Updated: February 24, 2016 12:44 IST

अभिनेत्री करीना कपूरचेही यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांवर लक्ष असणार आहे. ती खास प्रियंकासाठी वेळात वेळ काढून हा पुरस्कार सोहळा पाहणार कि, नाही ते माहित नाही.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २४ - यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळयात बॉलिवुडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा पुरस्कार प्रदान करणार असल्याने भारतीयांसाठी यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा तसा खास आहे. अन्य भारतीयांप्रमाणे अभिनेत्री करीना कपूरचेही यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांवर लक्ष असणार आहे. 
ती खास प्रियंकासाठी वेळात वेळ काढून हा पुरस्कार सोहळा पाहणार कि, नाही ते माहित नाही. पण आवडता अभिनेता लिओनार्डो डी कॅपरियोसाठी करीनाचे या पुरस्कार सोहळयावर लक्ष असेल. करीना लिओनार्डोची खूप मोठी चाहती आहे. 
निदान यंदा तरी त्याला ऑस्कर मिळावा अशी तिची मनापासून इच्छा आहे. लिओनार्डोला 'द रेवेनंट' चित्रपटासाठी बेस्ट अॅक्टरच्या कॅटगरीमध्ये नामांकन मिळाले आहे. करिना लिओनार्डोचा एकही चित्रपट चुकवत नाही. सध्या ती तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी असली तरी, भारतात रेवेनंट प्रदर्शित झाल्यानंतर मी पाहणार आहे असे करीनाने सांगितले. 
खूप आधीच लिओनार्डोला ऑस्कर मिळायला हवा होता असे करीनाला वाटते. ४१ वर्षीय लिओनार्डोला सहावेळा ऑस्कर पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले पण प्रत्येकवेळी त्याला पुरस्काराने हुलकावणी दिली.