करीना कपूर (Kareena Kapoor) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) या दोन्ही स्टारकीड्सने २४ वर्षांपूर्वी सोबतच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. २००० साली त्यांनी 'रेफ्यूजी' सिनेमातून अभिनयाला सुरुवात केली. तेव्हा सिनेमा फारसा चालला नाही पण दोघांची खूप चर्चा झाली. नंतर त्यांनी 'युवा','मै प्रेम की दिवानी हूँ','LOC कारगिल' मध्ये एकत्र काम केलं. आता बऱ्याच वर्षांनी दोघं एकाच स्टेजवर दिसले आहेत.
काल फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड सोहळा पार पडला. यावेळी करीना कपूरला 'जाने जान' या तिच्या ओटीटीवरील डेब्यूसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अभिषेक बच्चननेच स्टेजवरुन करीना कपूर खानच्या नावाची घोषणा केली. 'अशी व्यक्ती जिच्यासोबत मी करिअरला सुरुवात केली' असं तो यावेळी म्हणाला तेव्हा सगळ्यांनी एकच आवाज केला. करीना कपूर स्टेजवर आली आणि तिने अभिषेकचे आभार मानले.
करीना आणि अभिषेक यांनी बरीच वर्ष झाले एकत्र काम केलेलं नाही. याचं कारण म्हणजे करिष्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांचं आधी लग्न ठरलं होतं. साखरपुडाही झाला होता मात्र नंतर हे लग्न मोडलं. जानेवारी २००३ साली त्यांचं नातं तुटलं. जया बच्चन यांनी एका इव्हेंटमध्ये करिष्माला होणारी सून असंही म्हटलं होतं. यानंतर कपूर आणि बच्चन कुटुंबात काही काळ अबोला होता. यामुळेच करीना आणि अभिषेकही पुन्हा एकत्र दिसले नव्हते.