Join us

कपिल सिब्बल लिहीणार आयटम साँग

By admin | Updated: May 12, 2015 11:56 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ व माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल आता नव्या भूमिकेत दिसणार आहेत. कपिल सिब्बल बॉलीवूडमधील एका चित्रपटासाठी चक्क आयटम साँग लिहीणार आहेत.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १२ - काँग्रेसचे ज्येष्ठ व माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल आता नव्या भूमिकेत दिसणार आहेत. कपिल सिब्बल बॉलीवूडमधील एका चित्रपटासाठी चक्क आयटम साँग लिहीणार असून या चित्रपटात त्यांनी तब्बल पाच गाणी लिहीली आहेत. 

कपिल सिब्बल हे राजकारण व वकिली क्षेत्रात प्रसिद्ध असले तरी ते एक उत्तम गीतकारही आहेत. २०१३ मध्ये झळकलेल्या बंदूक या चित्रपटासाठी त्यांनी गाणी लिहीली होती. आता पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी लेखणी हातात घेत गाणी लिहीली आहे. प्रणव सिंह या चित्रपटाचे दिग्दर्शक असून 'जल्दी बता दे' असे या आयटम साँगचे बोल असतील. याविषयी कपिल सिब्बल म्हणतता, सध्या आयटम साँग हा चित्रपटाचा एक भाग बनला असून तुम्ही यापासून लांब जाऊ शकत नाही. 

प्रणव सिंह यांनी मला पाच वेगवेगळ्या प्रसंगावर गाणी लिहीण्याची विनंती केली. प्रणव सिंह यांची विनंती म्हणजे कोर्टात एखाद्याने मदत मागितल्यासारखे होते. मी प्रणव सिंह यांना नकार देऊ शकलो नाही असे सिब्बल यांनी नमूद केले. या चित्रपटात जिमी शेरगील व संजय पूरी हे प्रमुख भूमिकेत असून आयटम साँगचे चित्रीकरण बँकोकमध्ये होईल अशी माहिती सूत्रांनी दिली.