लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा आणि काळजात धडकी भरवणारा सिनेमा म्हणजे 'ज्युरासिक पार्क'.(jurassic park) हॉलिवूडमध्ये लोकप्रिय झालेल्या या सिनेमाचे अनेक भाग आले. प्रत्येक भाग चांगलाच गाजला. इतकंच नव्हे तर एका भागात चक्क भारतीय अभिनेता इरफान खानने (irrfan) अभिनय केला होता.' 'ज्युरासिक' सीरिजमधील नवीन सिनेमाचा ट्रेलर काल सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. 'ज्युरासिक वर्ल्ड रिबर्थ' (jurassic world rebirth) असं या सिनेमाचं नाव आहे. जाणून घ्या सिनेमाबद्दल सर्वकाही.
ज्युरासिक वर्ल्ड रिबर्थचा ट्रेलर
युट्यूबवर 'ज्युरासिक वर्ल्ड रिबर्थ'चा २ मिनिटं २५ सेकंदाचा ट्रेलर पाहायला मिळतोय. या ट्रेलरमध्ये दिसतं की, काही लोकांची एक टीम गुप्त कामगिरीवर असते. सध्या जे डायनोसॉर अस्तित्वात आहेत त्यांचा DNA मिळवण्यासाठी ही टीम प्रयत्न करते. याच DNA च्या माध्यमातून भयानक आणि क्रूर असे डायनोसॉर पुन्हा जन्माला येतात. त्यामुळे गुप्त कामगिरीवर असलेल्या टीमने लावलेला शोध त्यांच्या कसा अंगलट येतो, याची थरारक कहाणी ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय. 'ज्युरासिक वर्ल्ड रिबर्थ' सिनेमात दिग्गज कलाकारांची फौज आहे.
ज्युरासिक वर्ल्ड रिबर्थ कधी रिलीज होणार?
'अॅव्हेंजर्स' सिनेमातील नताशाच्या भूमिकेने प्रसिद्ध झालेली स्कारलेट जोहानसनची सिनेमात प्रमुख भूमिका असलेली दिसतेय. याशिवाय जोनाथन बेली, मेहरशला अली हे कलाकारही 'ज्युरासिक वर्ल्ड रिबर्थ'मध्ये बघायला मिळणार आहेत. ट्रेलरमध्ये अशी अनेक दृश्य आहेत जी पाहून अंगावर काटा उभा राहतो. याचवर्षी २०२५ मध्ये जुलै महिन्यात 'ज्युरासिक वर्ल्ड रिबर्थ' सिनेमा रिलीज होणार आहे. ट्रेलर पाहूनच सर्वांची उत्सुकता चाळवली गेलीय.